दुर्दैवी ! मुळा धरणाच्या कालव्यात बुडून वृद्धाचा मृत्यू

अहमदनगरः पोलीसनामा ऑनलाइन – मूळा धरणाच्या डाव्या कालव्यात पडल्याने एका वृध्दाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काळे आखाडा येथे शनिवारी (दि. 17) दुपारी 2 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळापासून 5 किमी अंतरावर येवले आखाडा येथे रात्री साडेआठच्या सुमारास मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

केशव मंजाहरी काळे (वय 75, रा. काळे आखाडा, राहुरी) असे मृताचे नाव आहे. काळे यांची शेती कालव्याच्या कडेला आहे. त्यांना दृष्टीदोष होता. दुपारी घरातून बाहेर पडल्यावर ते गायब झाले होते. त्यांच्या नातेवाईकांनी इतरत्र शोध घेतला. थोड्यावेळा ते पाय घसरून कालव्यात पडल्याच्या संशय नातेवाईकांना आला.

अखेर तो संशय खऱा ठरला. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचा मृतदेह येवले आखाडा येथून पाण्यातून बाहेर काढण्यात आला. काळे यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान गुरुवारी (दि. 15) सकाळी मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सोडले होते. शनिवारी (दि. 17) सकाळी कालव्यातून 250 क्यूसेकने पाणी सुरु होते.