धक्कादायक ! ‘कोरोना’ रिपोर्ट खिशात ठेवून दिल्ली ते कोलकता प्रवास, अनेकांची उडाली ‘भंबेरी’

कोलकता : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात विक्रमी 32 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा दहा लाखांच्या जवळ पोहचला आहे. जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यातच काही जणांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना धोका निर्माण होत आहे. एका कोरोना बाधित रुग्णाने दिल्ली ते कोलकता असा प्रवास केल्याने प्रवासात त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकजण सध्या भितीच्या छायेत आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाची चिंता वाढवली आहे.

एका 34 वर्षीय व्यक्तीने दिल्ली ते कोलकता व्हाया गुवाहाटी असा प्रवास केला. त्यावेळी त्याच्या खिशात कोरोना चाचणीचा अहवाल होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आला आहे. पश्चिम बंगालमधल्या उत्तर 24 परगण्यात असलेलं घर गाठण्यासाठी या व्यक्तीनं 14 जुलै रोजी स्पाईसजेटच्या विमानाने प्रवास केला. मात्र, त्यावेळी दिल्ली ते कोलकता अशी थेट विमानसेवा उपलब्ध नसल्याने त्याने कनेक्टिंग फ्लाईटच्या मदतीने गुवाहाटीमार्गे कोलकता गाठलं. संध्याकाळी पाच वाजता तो कोलकता विमानतळावर दाखल झाला.

त्या व्यक्तीने विमानतळावर उतरताच अधिकाऱ्यांना क्वारंटाइन केंद्रात नेण्याची विनंती केली. मात्र, या व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणं आढळून आली नाहीत तसेच त्याचे तापमान देखील सामान्य होते. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यास नकार दिला. अधिकारी नकार देत असतानाही तो प्रवासी क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्याची मागणी करत होता. अखेर त्याने आपल्याला खोकला असल्याचे सांगत खिशातून कोरोना चाचणीचा अहवाल काढला आणि अधिकाऱ्यांना दाखवला.

अधिकाऱ्यांनी प्रवाशाने दाखवलेला कोरोना टेस्टचा अहवाल पाहताच अधिकाऱ्यांना धक्का बसला. या प्रवाशाचा कोरोना टस्टचा अहवाल पॉझिटिव्ह होता. अधिकाऱ्यांनी तातडीने आरोग्य विभागीशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर विमानतळ आरोग्य विभागाने या प्रवाशाला न्यूटाऊनमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले. दरम्यान, विमानतळ अधिकाऱ्यांनी तो प्रवासी कोलकता येथे येताना कोणकोणत्या प्रवाशांच्या संपर्कात आला होता याचा तपास सुरु केला आहे.