पत्नीचा खून करून रक्त पिणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात दगड घालून ती खुन केल्यानंतर करवतीने तिचे शरीर कापून रक्त पिणाऱ्या पतीला येथील जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी हा निकाल दिला.

संजय पांडुरंग गायकवाड (रा. इंदिरानगर, लातूर)असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, संजय पांडुरंग गायकवाड याला आपली पत्नी सागरबाई संजय गायकवाड हिच्या चारित्र्याचा संशय होता. त्यावरुन त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. २०१५ मध्ये याच कारणावरुन संजय याने सागरबाई हिचा खुन केला होता. त्यानंतर तिचे शरीर कापून तिचे रक्त पिला होता. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही़ व्ही़ जोशी यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. या खटल्यात आरोपीचा मुलगा अजय व भावजय बबिता या प्रत्यक्षदर्शीनी दिलेली साक्ष महत्वाची ठरली. जिल्हा सरकारी वकिल विठ्ठल देशपांडे यांनी संजय गायकवाड याचे हे कृत्य घृणास्पद असल्याने त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तीवाद केला.

या प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी दिलेल्या निकालात आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक डी. बी. वाघमोडे यांनी काम पाहिले.