थरार ! राजधानी दिल्लीत पाठलाग करुन प्रॉपर्टी डिलरचा खून

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उद्यानामध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीवर तीन बंदुकधारी हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी गाडयांच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्यांच्यावर गोळया झाडून त्याची हत्या केली. बुधवारी सकाळी पूर्व दिल्लीतील प्रतापगंजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. राहुल सिंह नगर असे मृत व्यक्तीचे नाव असून 2017 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विनोद नगर मतदारसंघातून महापालिकेची निवडणूक लढवली होती.

राहुल सिंह नगर हे महापालिका निवडणूक लढवणार्‍या श्रीमंत उमेदवारांपैकी एक होते. जवळपास साडेनऊ कोटीची संपत्ती त्यांनी दाखवली होती. त्यांची हत्या करणार्‍या गुन्हेगारांची ओळख पटलेली नसून त्यांचा उद्देशही स्पष्ट झालेला नाही असे पोलिसांनी सांगितले. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. राहुल सिंह नगर यांच्यावर चार गोळया झाडण्यात आल्या. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलीस उपायुक्त जसमीत सिंह यांनी दिली. राहुल सिंह पेशाने प्रॉपर्टी डिलर असून पत्नी आणि मुलीसह ते विनोद नगरमध्ये रहायचे. गुन्हा घडला त्या ठिकाणाहून एक किलोमीटर अंतरावर त्यांचे घर आहे.