कोर्टात न्यायाधीशांना शिव्या देणारा उद्योजक गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोर्टात न्यायाधीशांना शिव्या देणाऱ्या आणि धमकावणाऱ्या उद्योजकाला मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. नवीन नाईक असे या आरोपीचे नाव असून हा प्रकार बुधवारी दुपारी अंधेरीतील महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात घडला होता.

नवीन नाईक (वय-40 वर्ष) याने त्याच्या कर्मचाऱ्याविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीचं काय झालं हे पाहण्यासाठी नाईक न्यायालयात आला होता . खटल्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्याने थेट न्यायदान सुरू असलेल्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला . पोलीस कर्मचाऱ्याने नाईकला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र नाईकने त्यालाही शिगीगाळ केली आणि धक्काबुक्की करत न्यायालयात घुसला.

न्यायालयात घुसल्यानंतर त्याने माझा खटला सुनावणीसाठी का घेतला नाही ? असा प्रश्न विचारत न्यायाधीशांना शिवीगाळ केली आणि धमक्या दिल्या. नाईकला अंधेरी पोलिसांनी अटक केली असून १६ मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.