इस्लामपूर : धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पैशाची मागणी केल्याने झालेल्या वादावादीतून प्रियकरानेच प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी (दि. 9) ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

मंगल पांडुरंग गुरव (वय 46, रा. नेर्ले, ता. वाळवा) असे मृत प्रियसीचे नाव आहे. तर अशोक पांडुरंग डेळेकर (वय 46, रा. कापूसखेड, ता. वाळवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान सोमवारी (दि. 5) मृत मंगल गुरव या महिलेच्या मुलाने आई बेपत्ता झाल्याची फिर्याद कासेगाव पोलिस ठाण्यात दिली होती.

इस्लामपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल आणि आरोपीचे अनैतिक संबंध होते. यामुळे ते नेहमी एकमेकांना भेटत असत. आरोपी हा मंगल यांना दुचाकीवरून इस्लामपुरात कामाच्या ठिकाणी सोडत होता. त्यांच्यात आर्थिक व्यवहारही होत होते. दि. 2 एप्रिल रोजी आरोपीने मंगल यांना फोन करून बोलवून घेतले. ते दोघेही सायंकाळी दुचाकीवरून बहे हद्दीतील निर्जन ठिकाणी गेले. तेथील पेठ ओढ्यानजीक मंगलने आरोपीकडे 50 हजारांची मागणी केली.

आरोपीने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. यातूनच दोघांत वादावादी झाली. या वादातून आरोपीने मोठा दगड उचलून मंगलच्या डोक्यात घातला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह ओढ्यातील पाण्यात टाकून तेथून तो पसार झाला. दरम्यान शुक्रवारी (दि. 9) बहे हद्दीतील पेठ ओढ्यामध्ये एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाच्या कपड्यावरून तो मृतदेह मंगलचा असल्याची ओळख पटली होती. डोक्याला, तोंडावर गंभीर मार लागल्याने मंगल यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.