कीर्तन सुरू असतानाच डोक्यात तबला घालून केला सहकार्‍याचा खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येथील गुरुद्वारामध्ये कीर्तनादरम्यान दोन कर्मचाऱ्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हत्येत झालं. दिल्ली येथील आर. के. पूरम येथे ही धक्कादायक घटना घडली. या वादात एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात तबला घातला. आणि त्यातच त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादर घटना ही शुक्रवारी घडली. मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव रविंद्र सिंग असं आहे. मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही या गुरुद्वारामध्ये ग्रंथी (म्हणजेच धर्मग्रंथ वाचणारी व्यक्ती) म्हणून काम करत होते. गुरुद्वाराच्या देखभालीचे कामही ग्रंथीच करतात. गुरुद्वारामधील कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या खोल्यांमध्ये हे दोघेही राहत होते. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आर. के. पूरम येथील सेक्टर सहामध्ये असणाऱ्या या गुरुद्वारेत दोघांमध्ये वाद झाला. तबल्याचा वापर करुन डोक्यावर अनेकदा टपली मारल्याप्रमाणे हलका धक्का देत आरोपी दर्शन हा रविंद्रला त्रास देत होता. मात्र दर्शन वारंवार असं करत असल्याने रविंद्र संतापला आणि त्यातून त्या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून दर्शनने रविंद्रच्या डोक्यात तबला घातला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने रविंद्रचा मृत्यू झाला. दरम्यान, रविंद्र मागील १६ वर्षांपासून या गुरुद्वारामध्ये काम करत होता. रविंद्र हा गुरुद्वारामधील प्रमुख ग्रंथी होता, त्यामुळेच दर्शनला रविंद्रची संपत्ती तसेच नोकरीचा हेवा वाटत होता आणि त्यातून त्याने हा हल्ला केल्याचा आरोप रविंद्रच्या कुटुंबियांनी केला आहे.

पोलीस उपआयुक्त (नैऋत्य विभाग) इनगीत प्रताप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने हल्ला केल्यानंतर रविंद्र यांच्या पत्नीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दर्शनने त्यांच्यावरही हल्ला केला. त्या गंभीर जखमी झाल्या आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने घटनास्थळाला भेट दिली. तेथील पुरावे ताब्यात घेतले. असं इनगीत प्रताप सिंग यांनी सांगितलं. जखमी अवस्थेमध्येच रविंद्र आणि त्यांच्या पत्नीला सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. शनिवारी उपचारादरम्यान रविंद्रचा मृत्यू झाला.

काही महिन्यांपूर्वी आम्ही दर्शनविरोधात तक्रार केली होती. त्यावेळीही त्याने माझ्या वडीलांना मारण्याचा प्रयत्न केल्या होत्या. तेव्हा पोलीसही गुरुद्वारामध्ये आले होते. गुरुद्वारा समितीने आपआपसात प्रकरण सोडवण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी तेव्हाच दर्शनला कामावरुन काढून टाकायला हवं होतं,” असं रविंद्र यांनी मुलगी लखविंदरने म्हटलं आहे. पुन्हा दर्शनने रविंद्रवर हल्ला केला होता असा आरोप रविंद्रच्या कुटुंबियांनी केला आहे. माझ्या कुटुंबियांवर अशाप्रकारे गुरुद्वारामध्ये हल्ला होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.