पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून पुण्यातील कोंढवा भागात राहणार्‍या एकाने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकऱणी मृताच्या वडीलांनी त्याची पत्नी, सासू, भाऊ आणि प्रियकराविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महंमद असगर महंमद शरीफ शेख (वय ४०, रा. नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीने नाव आहे. २ एप्रिल २०१९ मध्ये संगम पुलाजवळ ही घटना घडली होती. या प्रकरणी महंमद शरीफ इस्माईल शेख (वय ६७, रा. नाना पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मयताची पत्नी आसमा असगर शेख, सासू रजिया अन्सारी, पत्नीचा भाऊ परवेज अन्सारी व आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो समर्थ पोलिसांकडे पाठविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद असगर याने कोंढवा येथे फ्लॅट विकत घेतला होता. महंमद असगर व आसमा हे तेथे राहत होते. तिने आपल्यासोबत भांडण करून स्वतंत्र राहायचे असा हट्ट पतीकडे धरला होता. त्यामुळे त्याने कोंढव्यात राहण्यास गेला होता. त्यानंतर ते दोघे १० महिन्यांपासून वेगळे राहात होते. अस्माने असगरला तिच्या प्रियकरासोबत मारहाण केली. ते दोघे त्याचा छळ करत होते. फ्लॅट तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणत होते. असा आरोप इस्माईल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

२ एप्रिल रोजी सायंकाळी असगर यांनी संगम पुलाजवळ रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा त्यांना असगरच्या खिशात सुसाईड नोट मिळाली. त्यात माझ्या मृत्यूला पत्नी आसमा, सासू, मेव्हणा आणि तिचा प्रियकर जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली. चौकशी करून लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो समर्थ पोलिसांकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आला आहे.