7 वर्षाच्या मुलीनं सांगितलेला प्रकार ऐकून पोलिसही चक्रावले

नेल्लोर : पोलिसनामा ऑनलाइन – एका व्यक्तीने आपल्या पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिला जिवंत पुरल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील गोतलपलेम या गावात घडली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, पती पत्नीमध्ये काही घरगुती कारणांवरून वाद झाला होता. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. तेव्हा पतीने पत्नीच्या डोक्यावर लाकडाने प्रहार केला. त्यानंतर ती बेशुद्ध झाली.

याबाबत कोडावलुरु पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोन्नरू सुभाषिनी ही महिला आपला तिसरा पती बुडबुक्कल स्वमुलु यासोबत या गावात राहत होती. २७ मे च्या रात्री पती-पत्नीने दोघांनी दारु प्यायली होती. त्यावेळी काही घरगुती कारणांवरून त्या दोघांत वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात काठीने मारलं. तेव्हा पत्नी सुभाषिनी बेशुद्ध होऊन जमिनीवरती पडली. पत्नीचा मृत्यू झाला असं स्वमुलुला वाटलं. म्हणून त्याने जवळच्या एका ठिकाणी तिला जमिनीत जिवंत दफन केलं.

स्वमुलुला वाटलं घडलेला प्रकार कोणाच्या निदर्शनास आलेला नाही, मात्र ही संपूर्ण घटना सुभाषिनीच्या ७ वर्षाच्या मुलीने पाहिली. जेव्हा सुभाषिनीला जमिनीत दफन केलं जात होतं तेव्हा ती जिवंत होती, स्वमुलुने घडलेला प्रकार कोणासही न सांगण्याची त्या ७ वर्षाच्या मुलीला धमकी दिली आणि तो तेथून फरार झाला. आईचा मृत्यू आणि फरार झालेला बाप यामुळे एकटी पडलेल्या त्या ७ वर्षांच्या मुलीने पोलिस स्टेशन गाठलं.

सदर घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिस देखील हादरून गेले. मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनस्थळावर जात सुभाषिनीचा मृतदेह बाहेर काढून तो नेल्लोरच्या सरकारी रुग्णालयात पोस्टमार्टम साठी पाठवून दिला. सध्या पोलिस फरार आरोपी स्वमुलुचा शोध घेत आहेत. सुभाषिनीचा मृत्यू कधी झाला, कशामुळे झाला या सर्व प्रश्नांची उत्तरे पोस्टमार्टम रिपोर्टमधून उघड होतील. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.