Kolhapur News : ऊसाने भरलेल्या ट्रॉलीखाली सापडून कोगनोळीतील नागरिक ठार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोगनोळी (तालुका निपाणी) येथील रस्त्यावरून जात असताना मोटारसायकल घसरल्याने ऊसाने भरलेल्या ट्रॉलीखाली सापडून एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक ५ रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. प्रकाश पीरगोंडा पाटील (काका) (वय ७६) असे अपघात झालेल्या ववेक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की प्रकाश पाटील हे कोगनोळी बस स्थानकाकडून पी अँड पी सर्कलच्या दिशेने जात होते. लोखंडे गल्ली येथील भीमनगर जवळ आले असता रस्त्यावरील खडकावरून त्यांची मोटरसायकल घसरल्याने ते कागल येथील शाहू कारखान्याकडे जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉली खाली फेकले गेले. ट्रॉलीचे चाक त्यांच्या शरीरावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी ताबडतोब पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रॅक्टरचालक सौरभ राजाराम कोराने (वय २५) रा. नागाव तालुका करवीर यास ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. प्रकाश पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.