आयुष्याची 5 लाखाची जमापुंजी वाळवीने केली मातीमोल

अमरावती : अनेक जण आपली कमाई तांदळाच्या डब्यात, किंवा एखाद्या पेटीत साठवून ठेवतात जेणेकरून ती कोणाच्याही नजरेसमोर येऊ नये. मात्र ती रक्कम संकटाच्या काळात उपयोगी पडेल. आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील मायलावरम या गावातील व्यापाऱ्यानेही आपली आयुष्यभराची कमाई असलेली पाच लाखाची रोकड बँकेऐवजी घरातच एका पेटीमध्ये सांभाळून ठेवली होती. मात्र वाळवीने पेटीतील नोटा खाल्ल्याने आता मातीमोल ठरल्या आहेत.

बिजली जमालय्या अस या व्यपाऱ्याचे नाव असून, तो डुकरांचा व्यापार करतो. रोज होणाऱ्या व्यापारातील कमाई बँकेत ठेवण्याऐवजी घरातील एका पेटीत ठेवत असे. त्यातून जमा झालेल्या पाच लाख रुपयांतून या व्यापाऱ्याला नवे घर बांधायचे होते. ५०० व २०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ही रोख रक्कम पेटीत ठेवली होती. मात्र नोटांना वाळवी लागून त्या मातीमोल ठरल्याचे पाहताच बिजली जमायल्ला या व्यापाऱ्याला प्रचंड दु:ख झाले. जमायल्ला यांनी रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना या खराब नोटा वाटून टाकल्या. लहान मुलांच्या हातात इतकी मोठी रक्कम असल्याचे काही गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ हि माहिती पोलिसांना दिली. पोलीस चौकशीत वाळवीने खाल्लेल्या या नोटा बिजली जमायल्ला या व्यापाऱ्याने मुलांना दिल्याचे निष्पन्न होताच सारा प्रकार उजेडात आला.