70 वर्षांच्या वृध्दाची 3 वर्षांपासून भटकंती, ‘लॉकडाऊन’मध्ये परतली ‘स्मरणशक्ती’ आणि मिळालं ‘कुटुंब’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे बरेच लोक इतर शहरांमध्ये आपल्या कुटूंबांपासून दूर अडकले आहेत. ते सर्वजण एकमेकांना भेटण्यास आतुरतेने वाट पहात आहेत. यावेळी जरी काही लोक आपल्या कुटूंबांपासून दूर असतील तरी या लॉकडाऊनमुळे म्हैसूर च्या रस्त्यावर 3 वर्षे भटकत असलेल्या एका वयस्कर व्यक्तीला आपले कुटुंब सापडले आहे.

ही घटना 70 वर्षांच्या करम सिंह यांची आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार करम सिंह सुमारे 3 वर्षांपूर्वी आपल्या मुलाच्या लग्नासाठी पैशांची व्यवस्था करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील आपल्या गावातून बाहेर आला होता. त्याने चुकून बेंगळुरूला जाणारी ट्रेन पकडली, परंतु तो कसा तरी म्हैसूरला पोहोचला. घरापासून दूर असल्याने, लांब प्रवास आणि तणाव यामुळे तो आजारी पडला. आणि त्यामुळे त्याची स्मरणशक्ती गेली. तो त्याचे मागील आयुष्य विसरला. तो म्हैसूरच्या रस्त्यावर फिरू लागला. यावेळी लोकांनी दिलेल्या अन्नावर तो जिवंत राहू लागला.

आता देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे स्थानिक अधिकारी म्हैसूरमध्ये ड्युटी करत असताना करम सिंह त्यांना रस्त्यावर भेटले. त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. कोणालाही त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हते. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी त्यांना नांजाराजा बहादूर नावाच्या वृद्धाश्रमात ठेवले.

वृद्धाश्रमातील काही मानसोपचारतज्ज्ञांनी त्यांच्यावर उपचार केले. त्याचा परिणाम असा झाला की त्यांची स्मरणशक्ती हळू हळू परत येऊ लागली. त्यांनी आपल्या कुटुंबाचा पत्ता सांगितला जो उत्तर प्रदेशचा होता. अशा परिस्थितीत म्हैसूर सिटी कॉर्पोरेशनने पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्या कुटूंबाशी संपर्क साधला. त्यांच्या त्रस्त मुलांनी करम सिंहचा मृत्यू झाला असावा असे गृहीत धरण्यास सुरुवात केली होती. पण जेव्हा त्यांना कळले की करम सिंह जिवंत आहेत आणि अधिकारी त्यांना घरी पाठवण्याची तयारी करीत आहेत, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.