गुजरात : तुरूंगात असताना 8 वर्षात घेतल्या 31 पदव्या, सुटका होताच मिळाली सरकारी नोकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुरुंगात गेल्यानंतर कैद्यांचे जीवन एकतर खूपच निराश होते किंवा त्यापेक्षाही धोकादायक बनते. तुरूंगात गेल्यानंतर कैदी आपले भविष्य चांगले सुधारण्याचा प्रयत्न करतो हे फारच कमी आहे. गुजरातमधील भावनगरमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे राहणारे भानुभाई पटेल यांनी तुरूंगात असताना 8 वर्षात 31 पदव्या घेतल्या. तुरूंगातून सुटका होताच त्यांना सरकारी नोकरीची ऑफरही मिळाली. नोकरीनंतर त्यांनी 5 वर्षात आणखी 23 पदव्या घेतल्या. त्यानंतर भानुभाई पटेल यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम आणि अगदी वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंदले गेले आहे.

का गेले होते ते तुरुंगात
भानुभाई पटेल (वय 59) हे भावनगरच्या महुवा तहसीलचे आहेत. अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर ते 1992 मध्ये मेडिकलची डिग्री घेण्यासाठी अमेरिकेत गेले. येथे त्यांचा एक मित्र अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर काम करत असताना पगार भानुभाऊंच्या खात्यावर ट्रान्सफर करत असे. यामुळे त्यांच्यावर परकीय चलन नियमन कायदा (FERA) उल्लंघन केल्याचा आरोप लागला. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 10 वर्षे त्यांना अहमदाबाद तुरूंगात शिक्षा भोगावी लागली.

सामान्यत: तुरूंगात जाणाऱ्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नाही. मात्र तुरूंगातून सुटल्यानंतर भानुभाई पटेल यांना आंबेडकर विद्यापीठाकडून नोकरीची ऑफर मिळाली. भानुभाईंनी नोकरीनंतर 5 वर्षात आणखी 23 पदव्या घेतल्या. अशा प्रकारे, त्यांनी आतापर्यंत 54 पदव्या घेतल्या आहेत.

तुरूंगातील अनुभवांवर लिहिले तीन पुस्तके
भानुभाईंनी कोरोना साथीच्या आजारामुळे लॉकडाऊनच्या वेळी तुरुंगात असलेल्या अनुभवावर आणि जागतिक स्तरावरील रेकॉर्डवर गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील तीन पुस्तके लिहिली आहेत. गुजराती पुस्तकाचे शीर्षक ‘जेलना सालिया पछ की सिद्धि’, इंग्रजीत ‘BEHIND BARS AND BEYOND’ आहे. भानुभाई यांनी 13 व्या विधानसभा निवडणुकीत प्रिसायडिंग अधिकारी म्हणूनही काम केले आहे.

तुरूंगात शिक्षित कैद्यांची संख्या जास्त
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या अहवालानुसार, गुजरात तुरूंगात शिक्षित कैद्यांची संख्या अशिक्षितांपेक्षा जास्त आहे. त्यात पदवीधर, अभियंता, पदव्युत्तर कैदी यांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, गुजरातच्या तुरूंगात 442 पदवीधर, 150 तांत्रिक पदविका-डिप्लोमा, 213 पदवीधर आहेत. बहुतेक आरोपी खून आणि अपहरणाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत.