‘अण्णा-शेवंता’चा फोटो त्यानं पाठवला पुण्यातील 28 वर्षीय महिला होमगार्डला, शहर समादेशक आला ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीवर गाजलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीचा फोटो पाठवून एकाने महिला होमगार्डचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने अण्णा आणि शेवंताचा फोटो पाठवून प्रेमाला वय नसते असा मेसेज त्याने महिला होमगार्डला पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत शहर समादेशकाविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पीडित महिला होमगार्डने अण्णा शेवंताच्या त्या फोटोमुळे विनयभंग झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. महिला होमगार्डच्या तक्रारीवरून पोलिसांनी शहर समादेशकाला अटक केली. उत्तम शिवाजी साळवी (रा. उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्या शहर समादेशकाचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिला होमगार्डने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार मार्च ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, साळवी हा होमगार्डचा शहर समादेशक आहे. त्याने फिर्यादी यांच्याशी जवळीक साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवला होता. दरम्यान, त्याने पीडित महिलेला रात्रीस खेळ चाले या टीव्ही मालिकेतील अण्णा आणि शेवंताचा एकमेकांच्या मिठीत असलेला फोटो पाठवला. तसेच त्याने प्रेमाला वय नसते असा मेसेज पाठवला होता. तसेच त्याने वाईट नजरेने पाहून मनास लज्जा उत्पन्न होईल असे साळवी बोलत होता. तसेच माझ्या सांगण्याप्रमाणे वागली नाहीस तर कामावरून कमी करण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, फिर्य़ादी यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांच्याकडून बिबवेवाडी पोलीस ठाण्याकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. तर बिबवेवाडी पोलिसांनी हा गुन्हा विश्रांतवाडी पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून समादेशकाला अटक केली.

You might also like