किरकोळ वादातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून एका व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावात ही घटना घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. रशीद तांबोळी असे त्या व्यक्तीचे नाव असून तो साठ टक्के भाजला आहे.

रशीद तांबोळी यांचे गावामध्ये किराणामालाचे दुकान आहे. काही दिवासांपूर्वी गावामध्ये रस्त्याचे काम सुरू होते. काम सुरू असताना दुकाना शेजारी राहणारे हृषीकेश लोखंडे आणि किरण जाधव यांनी दुचाकी नेली. यावरून त्यांच्यात वाद झाले. गावकऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता.

मात्र, लोखंडे आणि जाधव यांच्या मनात तांबोळी विषयी राग होता.मंगळवारी रात्री एकच्या सुमारास या दोघांनी रशीदला फोन केला. फोन करून त्यांनी सिगारेट आणि माचिस पाहिजे असल्याचे सांगून त्याला बाहेर बोलावले. रशीद बाहेर येताच या दोघांनी सोबत आणलेले रॉकेल त्याच्या अंगावर ओतून पेटवले. दरम्यान गावातील लोक उकाड्यामुळे बाहेर झोपले होते. त्यांना रशीदचा आरडाओरडा ऐकून जाग आली.

गावकऱ्यांनी रशीदच्या दिशेने धाव घेत आग विझवली. रशीदला जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलीसांनी हृषीकेश लोखंडे आणि किरण जाधवला अटक केली आहे. रशीदवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तो साठ टक्के भाजला आहे.