त्यानं चक्क पोलिस स्टेशनमध्ये FB LIVE केलं अन् स्वतःला पेटवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोलिस स्टेशनमध्ये फेसबुकवर लाइव्ह करत पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. नवी दिल्लीतील प्रेमनगर पोलिस स्टेशनमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अंशु आर्य (वय 24) असे या तरुणाचे नाव आहे.

डीसीपी एसडी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंशु स्वत: वर ज्वलनशील साहित्य टाकून पोलिस स्टेशनच्या आत आला. पोलिस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्याने हेड कॉन्स्टेबल संदीपला विचारण्यास सुरवात केली. पोलिस त्या युवकाला समजावण्याआधीच त्या युवकाने स्वत: ला पेटवून घेतले आणि आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्याला आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस गुन्हा नोंदवून तपास करत आहे.

अंशु दसऱ्याच्या दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या वडिलांसह जात होता. तेव्हा त्याची अमन डबास आणि हरद्वीप डबास यांच्याशी टक्कर झाली. त्यात त्याचा मोबाईल तुटला. त्या दोन तरुणांनी त्याच्याशी व त्याच्या वडिलांशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर रात्री 10.30 च्या सुमारास अंशुने पोलिस स्टेशनमध्ये येऊन अमन आणि हरद्वीपविरोधात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.

अंशुच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांत तक्रार दिल्याने भांडणानंतर आरोपी अंशु व त्याच्या वडिलांना धमकावत होते आणि जीवे मारण्याची धमकी देत होते. पोलिसांना याबाबत तक्रार करूनही त्यांनी या विरुद्ध कोणतेही कारवाई केली नव्हती. यामुळे अंशु नैराश्यात आला आणि शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अंशु ज्वलनशील साहित्य टाकून पोलिस ठाण्यात गेला. पोलिस स्टेशनमध्ये त्याने त्याने स्वत: ला पेटवून घेतले.

Visit : Policenama.com