Dhule News : धारदार हत्याराने भोसकून हत्या, काँग्रेस भवन समोर बॉडी सापडल्याने प्रचंड खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे येथील एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. विशाल गरुड (वय, ४३) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याबाबत मृताच्या कुटुंबांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी, धुळे शहरातील काँग्रेस भवनाजवळ रात्रीच्या दरम्यान हा खून झाला आहे. हा खून पूर्व वैमनस्यातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र या हत्येमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यामधून काही तपास लागतो का यावरून पोलिस प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, रात्री उशीरा झालेल्या या हत्येमुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना धक्काच बसला आहे. जोपर्यंत आरोपींचा शोध घेतला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे नातेवाईंकांनी स्पष्ट केले होते. पोलिसांच्या सांगण्यानंतर मात्र नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. आरोपींचा तात्काळ शोध घेण्यात यावा अशी मागणी संबंधित नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. मात्र संबंधित हत्येबाबत पोलिसांना अद्याप कुठलाही सुगावा लागला नाही. विशाल गरुड यांचा खून कोणी आणि का केला? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.