धक्कादायक ! कोरोनाची लक्षणे आढळल्याने जेष्ठाची आत्महत्या, पुणे जिल्ह्यातील घटना

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची लक्षणे आढळल्याने आलेल्या नैराश्यातून एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे रविवारी (दि. 25) ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रकाश विष्णूपंत भगत (वय 65) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. भगत यांना गेल्या चार-पाच दिवसांपासून घसादुखी, अंगदुखी, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे स्थानिक रुग्णालयात त्यांना कोरोना तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी रविवारी भिगवण येथील त्यांच्या राहत्या घरातील स्वयंपाक खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत भिगवण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी कोरोनाबद्दल भीती न बाळगता तातडीने तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.