वाहतूक पोलिसाने केला खोटया पोलीस निरीक्षकाचा पर्दाफाश

अहमदाबाद  : वृत्तसंस्था – वाहतूक पोलिसांनी पकडलेली गाडी सोडवण्यासाठी एका ५३ वर्षीय व्यक्तीने आपण पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी वाहतूक पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्याची उलट तपासणी केली असता त्याचा खरा चेहरा समोर आला. विनोदसिंह हरीसिंह राठोड असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार अहमदाबादमधील प्रल्हाद नगर येथील मंदील चौकात घडला.

विनोदसिंह राठोड याने आपली गाडी मंदील चौकामध्य चुकीच्या पद्धतीने पार्क केली होती. त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक कॉन्स्टेबल रमेश जीवा हे चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाई करीत होते. त्यावेळी रमेश जीवा यांनी राठोड याची गाडी नो पार्किंगमधून उचलली.

हा प्रकार विनोदसिंह यांना समजताच त्यांनी मंदील चौकात धाव घेऊन वाहतूक पोलीस रमेश जीवा यांना धारेवर धरले. रमेश जीवा यांच्यावर दडपण आणण्यासाठी त्यांनी राणीप पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी केली. मी राणीप पोलीस स्टेशनमध्ये निरीक्षक असून व्ही.एच.राठोड आपले नाव आहे. तुम्ही माझी गाडी कशी उचलू शकता ? असा सवाल त्यांनी जीवा यांना विचारला.

जेव्हा मी त्यांना ३५० रुपये दंड भरण्यास सांगितला तेव्हा त्यांचा पार आणखी चढला. आपण पोलीस निरीक्षक असल्यामुळे आपल्याला दंड लागू होत नाही असे त्यांनी जीवा यांना सांगितले. या प्रकारानंतर जीवा यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन लावून सर्व प्रकार सांगितला. वरिष्ठांच्या निर्देशावरुन त्यांनी राणीप पोलीस स्टेशनला फोन लावला.

तिथल्या पोलीस निरीक्षकांशी बोलताना व्ही.एच.राठोड नावाचा कोणी पोलीस निरीक्षक नसल्याचे त्यांना समजले. जेव्हा जीवा यांनी जाब विचारणाऱ्याला उलटे प्रश्न केले त्यावेळी विनोदसिंह यांनी त्यांची खरी ओळख सांगितली व पोलीस नसल्याचे कबूल केले. आयपीसीच्या कलम १७० आणि १८६ अंतर्गत विनोदसिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like