Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये इंस्टाग्रामवर शोधले ग्राहक, ‘तिप्पट’ किंमतीत विकली दारू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी पूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन असून यादरम्यान लोक आपल्या घरात बंद आहेत आणि आपल्या सवयींसोबत तडजोड करत आहेत. बर्‍याच लोकांना मद्यपान करण्याची सवय असून ते सध्याच्या काळात मद्यपान करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने या लॉकडाऊनचा फायदा घेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर दारूची विक्री करण्यास सुरवात केली.

बेंगळूरच्या एका व्यक्तीने लॉकडाऊन आणि कर्फ्यूचा फायदा घेत सोशल मीडिया द्वारे आपले ग्राहक शोधले आहेत.

माहितीनुसार, किरण नावाच्या एका व्यक्तीने एमआरपी पेक्षा ३ पट जास्त किंमतीने ग्राहकांना दारू विकण्यासाठी इंस्टाग्रामचा वापर केला आहे. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करत तो माणूस दारू विक्री करत होता, पण लवकरच तो उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर आला.

माहितीनुसार, आरोपी व्यक्ती लॉकडाऊन दरम्यान सेवानिवृत्त कर्मचार्‍याच्या मदतीने डिफेन्स कॅन्टीनमधून दारू खरेदी करून अधिक किंमतीला विकत असे. लॉकडाउन कालावधीत जास्तीत जास्त पैसे कमवणे हे त्या व्यक्तीचे एकमेव लक्ष्य होते.

कथितपणे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा माणूस त्याच्या ग्राहकांशी संपर्क साधत होता आणि तो थेट ग्राहकांपर्यंत डिलिव्हरी देत नव्हता. दारूच्या डिलिव्हरीपूर्वी तो ऑनलाइन पेमेंट अ‍ॅप गुगल पे आणि फोनपेद्वारे पैसे घेत असे. पैसे मिळाल्यानंतर तो दारू एका सुनसान जागी लपवायचा आणि ग्राहकाला त्याचा पत्ता सांगायचा.