धक्कादायक ! विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून ‘कोरोना’चं औषध देतोय सांगून विषप्रयोग

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरणा आहे. अशा परिस्थितीत घरापर्यंत कोणी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आले तर लगेच सहकार्य केले जाते. नेमकी हीच बाब हेरुन एका व्यक्तीने कोरोना व्हायरसचे औषध देतोय सांगून एका कुटुंबावर विषप्रयोग केला. दिल्लीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

आरोपीचा व्यवसाय असून त्याच्या पत्नीचे होमगार्डसोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याचा संशय त्याला होता. बदला घ्यायचा होता. म्हणून त्याने हा कट रचला. आरोपी दिल्ली जवळ अलीपूरमध्ये राहतो. त्याने कटामध्ये दोन महिलांना सहभागी करुन घेतले. या दोन महिला आरोग्य सेविका बनून रविवारी होमगार्डच्या घरी गेल्या. त्यांनी कोरोना व्हायरसचे औषध देतोय सांगून होमगार्ड आणि त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांना विष दिले.

औषध घेतल्यानंतर चौघेही आजारी पडले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. होमगार्डची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन दोन्ही महिलांना शोधून काढले. त्यांची चौकशी सुरु केल्यानंतर त्यांनी सर्व कटाचा खुलासा केला. पोलीस उपायुक्त गौरव शर्मा यांनी ही माहिती दिली.आरोपीने महिलांना आरोग्य सेविका बनून तुम्ही होमगार्डच्या घरी जा, तिथे कोरोनाचे औषध देतोय सांगून विषप्रयोग करा असे त्याने सांगितले होते. त्यानुसार हे सर्व घडले.