शरद पवारांचे निवासस्थान असणार्‍या ‘मोदीबाग’ सोसायटीला मॅनेजर कुलकर्णीनं 12 लाखाला गंडवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नामवंतांचे निवासस्थान असलेल्या मोदीबाग या प्रतिष्ठीत सोसायटीला १२ लाख रुपयांना चुना लावून मॅनेजर फरार झाला आहे.

बलभीम शरद कुलकर्णी (रा. पवारनगर, थेरगाव) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मोदीबाग सोसायटीच्या वतीने सुबोध अशोक मुथा (वय ४३, रा. मोदीबाग सोसायटी, गणेशखिंड रोड) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१८ ते २०२० दरम्यान घडला आहे. बलभीम कुलकर्णी हे मोदीबाग सोसायटीचे मॅनेजर म्हणून काम करीत होते. त्यांनी २०२८ -१९ व २०१९ -२० या दोन आर्थिक वर्षात सोसायटीमधील फ्लॅटधारकांकडून सोसायटी मेन्टनन्स म्हणून १५ लाख ३ हजार ७४७ रुपये रोख स्वरुपात स्वीकारले. त्यापैकी ३ लाख २५ हजार ६८० रुपये त्यांनी सोसायटीच्या खात्यात जमा केले. उरलेले ११ लाख ७८ हजार ६७ रुपये त्यांनी विना परवाना स्वत:च्या ताब्यात ठेवले. सोसायटीच्या कमिटीला काहीही कळविले नाही. ते ३० डिसेंबर २०१९ पासून कोठेतरी निघून गेले.

३० डिसेंबरपासून ते परत सोसायटीमध्ये कामाल आले नाही. लोकांनी घरी जाऊन चौकशी केल्यावर तेथेही ते आढळून आले नाही. त्यामुळे सोसायटीचे आर्थिक व्यवहार तपासून पाहिल्यावर त्यांनी लाखो रुपये सोसायटीच्या खात्यात भरले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे.