आता मंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद विमानतळे अदानी समूहाकडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अदानी समूह ( Adani Group) एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडून ( Airport Authority of India) मंगळुरू विमानतळ ३१ ऑक्टोबर रोजी, लखनऊ विमानतळ २ नोव्हेंबर तर अहमदाबाद विमानतळ ७ नोव्हेंबरपासून चालविण्यासाठी ताब्यात घेणार आहे. खासगी कंपन्यांकडून हे विमानतळ विकसित करून चालविण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. अदानी समूहाकडून बाजी मारण्यात आली. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ( Union Ministry of Civil Aviation) मंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद विमानतळ चालविण्यासाठी अदानी अहमदाबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, अदानी लखनऊ इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, अदानी मंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या तीन कंपन्यांशी २१ ऑक्टोबर रोजी सामंजस्य करार करण्यात आले.

या करारांमध्ये कस्टम, इमिग्रेशन, आरोग्य, सुरक्षा व्यवस्था इत्यादी गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच दळणवळण, नेव्हिगेशन, हवाई वाहतूक व्यवस्थापन या गोष्टींबाबत एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडून अदानी समूहाच्या या तीन कंपन्यांशी स्वतंत्र करार करण्यात आले. ही तीनही विमानतळे अदानी समूहाला विकसित करण्याकरिता व चालविण्यासाठी द्यावे याबाबतचा पहिला करार यंदाच्या वर्षी १४ फेब्रुवारीला करण्यात आला होता.

राज्य सरकारच्या आक्षेपांमुळे विलंब
मंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद हे तीनही विमानतळे अदानी समूहाला चालविण्यासाठी देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून जुलै २०१९मध्येच घेण्यात आला होता. तसेच आणखी ३ विमानतळे अदानी समूहाला चालविण्यास देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून गेल्या महिन्यात घेण्यात आला. राज्य सरकारांनी घेतलेले आक्षेप व न्यायालयात सुरू असलेले खटले यामुळे तीन विमानतळांचे अदानी उद्योग समूहाकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेस उशीर झाला. यामुळे विमानतळांचे हस्तांतरण अदानी समूहाकडे कधी होते याकडे हवाई वाहतूक उद्योगातील लोकांचे लक्ष लागून राहिले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like