टिपर-आयशरच्या धडकेत २ फळविक्रेत्यांचा मृत्यू

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाईन – डाळिंबाच्या विक्रीसाठी नागपूरकडे माल घेऊन जात असताना आयशर टेम्पो आणि टिपरची समोरासमोर धडक होऊन सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मरवडे, यड्राव येथील दोघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (शनिवार) पहाटे पाचच्या सुमारास घडली.

लिंगेश्वर यादव ( वय ३१, रा. मरवडे ) आणि कपिल बाळू पाटील ( वय १७, वर्षे, रा. यड्राव ता. मंगळवेढा ) अशी अपघातात मृत्‍यू झालेल्या दोघांची नावे आहेत. समाधान यादव हे गंभीर जखमी झाले आहेत. समाधान यांची प्रकृती गंभीर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
लिंगेश्वर यादव यांच्या मालकीचा आयशर टेम्पो (एम.एच. १३ ए. एक्स. ३७०१) मरवडे येथून माल घेऊन नागपूरच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील कळंब गावच्या परिसरात शनिवारी (ता.२) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आयशर व टिपर यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जणांना जीव गमवावा लागला आहे.

या अपघातातील कपिल पाटील हा अकरावीमध्ये शिक्षण घेणारा महाविद्यालयीन तरुण सहज फिरायला म्हणून या आयशर टेम्पोसोबत चालला होता. या अपघातात त्‍याचा मृत्‍यू झाला. तसेच लिंगेश्वर यादव हा विवाहित असून तीन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता तर त्याच्यासोबत असणारा समाधान यादव हा त्याचा मोठा भाऊ आहे. समाधान यादव यांची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघाताची घटना समजताच नरवडे व यड्राव गावावर शोककळा पसरली आहे.