कोरोनामुळे आंबा बागायतदारांची होणार कोंडी बाजारपेठेवर अनिश्चिततेचे सावट

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये शेतकरी, व्यवसायिक, व्यापार्‍यांचा समावेश आहे. विशेषतः कोरानामुळे कोकणातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. कोकणात आंबा हंगामाची सुरवात झाली आहे. आंबा विक्रीसाठी तयार आहे. पण खरेदीसाठी व्यापारी आणि ग्राहकच मिळत नसल्याचे बागायदारांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने आंब्याच्या वितरण आणि विक्रीसाठी व्यवस्था करावी अशी मागणी बागायतदारांकडून केली जात आहे.

रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकुण 42 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 16 हजार 500 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास 21 हजार 424 मेट्रीक टन इतके येवढे उत्पादन अपेक्षित असते. फेब्रुवारी महिन्यापासून हा आंबा बाजारात दाखल होण्यास सुरवात होते. यंदा मात्र मार्च महिन्याच्या उत्तरार्धात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव, त्यानंतर संचारबंदी त्यामुळे आंबा बागायतदारांची मोठी कोंडी झाली आहे.हंगामाच्या सुरुवातीला बाजारात दाखल होणार्‍या आंब्याला चांगला दर मिळत असतो. मात्र नेमके याच वेळेस बाजारात अनिश्चिततेच वातावरण तयार झाले आहे. आंब्याच्या खरेदी विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयार झालेल्या आंब्याला चांगला दर मिळेल की नाही याची धास्ती आहे. आंब्याचा हंगाम हा अडीच ते तीन महिने चालतो. यातील सुरवातीचा महिनाच बागायदारांसाठी फायदा देणारा असतो. कारण नंतर बाजारात आंब्याची आवक वाढते आणि दर पडत जातात.

राज्यात 1.82 लाख हेक्टर आंबा लागवडीखालील क्षेत्र आहे. त्यापासून 5 लाख टन आंबा उत्पादन घेतले जाते. राज्यात बहुतांश भागात आंबा लागवड होत असली यातील 90 टक्के उत्पादन हे एकटया कोकणातून होते. हापूस, पायरी, रत्ना, सिंधू, केसर, राजपुरी आणि वनराज यासारख्या आंब्याच्या प्रजातींचे उत्पादन कोकणातून केले जाते. यातील हापूस आंब्याला देशाविदेशातून मोठी मागणी असते. फेब्रुवारी आणि मार्च मध्ये कोकणातील आंब्याला बाजारात चांगला भाव मिळतो. मात्र आंबा तयार असूनही बाजार पाठवता येत नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठांमध्ये खरेदी विक्री थंडावली आहे. हीच परिस्थिती कायम राहीली तर बागायदारांचे मोठे नुकसान होणार असल्याची शक्यता आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.