अचानक शेकडोंच्या संख्येने जमिनीवर पडून मरू लागली वटवाघुळं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे एका आंब्याच्या बागेत शेकडो वटवाघुळांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये अज्ञात विषाणूची भीती आहे. दरम्यान प्राणी व वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली आणि नमुने भोपाळला पाठविले.

सिंगरौली जिल्ह्यातील माडा तहसीलच्या पडरी या गावात आंब्याच्या बागामध्ये हजारो वटवाघूळ रहस्यमयपणे मृत अवस्थेत सापडले. अनेक वटवाघूळ जमिनीवर तडफडत होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या नजरेसमोर बरेच वटवाघूळ जमिनीवर पडत होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. घाईघाईत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे पथक व पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृत वटवाघूळांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी भोपाळ येथे नमुने पाठविले. त्याचवेळी काही लोक म्हणतात की, त्यांनी आंब्याच्या बागेत काळ्या रंगाच्या काही वस्तू जमिनीवर विखुरलेल्या पाहिल्या. जेव्हा त्या लोकांनी जवळ येऊन पाहिले, तेव्हा त्यांना आढळले की, दूरपर्यंत वटवाघुळाचे मृतदेह पडले होते. काही त्याच्या डोळ्यासमोर जमिनीवर पडत होते तर काही जमिनीवर तडफडत होते.

अलीकडेच अशाच काही राज्यांमधून वटवाघुळांच्या मृत्यूच्या बातम्या समोर आल्या असून त्यानंतर आता मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील माडा तहसीलमधून वटवाघुळाचे प्रकरण समोर आले आहे. लोकांमध्ये कोरोना विषाणूची भीती अजून संपलेली नव्हती, की वटवाघुळाच्या मृत्यूनंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोक म्हणतात की, त्यांना भीती आहे की, काही विषाणूमुळे तर वटवाघुळं मेली नसतील? दुसरीकडे या भागात नवीन विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. सिंगरौलीच्या पशुवैद्य अनामिका कुशवाहा सांगतात की, वटवाघुळांचा नमुना भोपाळला तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. ज्याचा तपास अहवाल आल्यानंतरच समजेल की, त्यांचा मृत्यू व्हायरसमुळे झाला कि उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे.