अलर्ट : जर तुम्ही खात असाल ‘हे’ मासे तर व्हा सावधान, अन्यथा ‘जीव’ जाईल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मासे हे केवळ अनेक लोकांचे आवडते मांसाहारच नाही तर आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही हे खूप फायदेशीर देखील मानले जाते. परंतु काही लोकांनी याला एक फायद्याचा व्यवसाय केला आहे. ज्यामधून अनेक लोकांच्या जीवाशी खेळले जात आहे. खरं तर महाराष्ट्र सरकारने लोकांना परदेशी मंगूर मासे खाण्यास मनाई केली आहे कारण त्याचा लोकांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो.

महाराष्ट्रात मत्स्यव्यवसाय विभागाने आफ्रिकन व परदेशी मंगूर (थाई मंगूर) मासे न खाण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी फिश मार्केटमध्ये पोस्टर्स लावले आहेत. पोस्टरमध्ये लोकांना हे मासे आहारातून टाळण्यास सांगितले असून ते सेवन केल्यास होणाऱ्या आजारांबाबत सांगितले आहे.

महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत २८ टन विदेशी मंगूर मासे जप्त करून त्यांना पुरले आहे. त्याच वेळी मुंबईतील भिवंडी बाजारातून केवळ १५ टन मंगूर मासे पकडले गेले आणि त्यांना मारण्यात आले. इंदापूर येथे ८ टन व भंडारा येथे ७ टन मासे जप्त करण्यात आले आणि त्यांना मारण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरूद्ध एफआयआरही दाखल केला आहे.

महाराष्ट्र सरकारने येत्या दहा दिवसांत संपूर्ण राज्यातून या माशाचा साठा संपविण्याचे लक्ष्य ठेवले असून, जो कुणी या माशास पाळताना किंवा विक्री करताना आढळला त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

तज्ञांच्या मते हे मासे निसर्गाबरोबरच मनुष्यासाठीही हानिकारक आहेत. हा मासा खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह यासारखे घातक रोग होऊ शकतात. महाराष्ट्रात किंवा देशातील कोणत्याही राज्यात स्वदेशी मंगूर वाढवणे, विक्री करणे आणि खाणे यावर कोणतेही बंधन नाही. केरळ सरकारने १९९८ मध्ये आफ्रिकन मंगूरवर प्रथम बंदी घातली होती.

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (एनजीटी) सरकारला माशांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. यानंतर सन २००० मध्ये एनजीटीच्या आदेशानंतर भारत सरकारने त्याच्या पाळण्यावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती.

You might also like