सावरकरांकडूनच धर्माच्या आधारावर फूट पाडण्यास सुरवात: अय्यर

लाहोर : वृत्तसंस्था
कॉंग्रेसचे माजी नेते मणिशंकर अय्यर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. नुकतेच त्यांनी पाकिस्तानमधील लाहोर येथे ”स्वातंत्र्य सेनानी वि.दा.सावरकर यांनीच देशात सर्वप्रथम द्विराष्ट्र ही संकल्पना मांडली आणि धर्माच्या आधारावर जनतेमध्ये फूट पाडण्यास सुरवात केली,” असा वादग्रस्त दावा अय्यर यांनी आज लाहोर येथे केला. त्यांच्या या विधानावर अर्थातच सर्वांनी टीका केली आहे.

लाहोर येथे आज झालेल्या एका कार्यक्रमात अय्यर यांनी हे विधान केल्याचे वृत्त “एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. “भारतातील सध्याची परिस्थिती बिकट आहे. 1923 मध्ये वि. दा. सावरकर नावाच्या व्यक्तीने “हिंदुत्व’ हा शब्द तयार केला. हा शब्द कोणत्याही धार्मिक ग्रंथांमध्ये नाही. त्यामुळे द्विराष्ट्र संकल्पनेचे पहिले प्रचारक असलेले हे सध्या भारतात सत्तेत असलेल्यांचे वैचारिक गुरू आहेत,” असे मणिशंकर म्हणाले.

अय्यर यांनी गेल्या आठवड्यात महंमद अली जीना यांच्या तैलचित्रावरून ओढवून घेतलेल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मी जीनांना कायदे आझम म्हटल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. एम. के. गांधी यांना महात्मा गांधी म्हणणारे अनेक पाकिस्तानी मला माहीत आहेत. मात्र यामुळे ते देशद्रोही पाकिस्तानी ठरतात का,’ असा सवाल अय्यर यांनी केला.

मणिशंकर अय्यर यांचा वादग्रस्त विधाने करण्याचा इतिहास मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “नीच’ म्हटल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाने गेल्याच वर्षी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तरीही त्यांची ही सवय अद्याप कायम असल्याचे त्यांनी केलेल्या विधानांमधून दिसते.