बॉलिवूडला धक्का ! एकाच दिवशी दोन कलाकारांचे ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बॉलिवूड सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे, असेच म्हणावे लागेल. कारण एकाच दिवशी 2 कलाकारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अभिनेता मनीष पॉल आणि अभिनेत्री तनाज इराणी यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचा रिपोर्ट हाती आल्यानंतर मनीष पॉल शूटिंगचे लोकेशन सोडून मुंबईत आला आहे. त्याने मुंबईतील घरी स्वत:ला क्वाॅरंटाईन केले आहे. सध्यातरी मनीष पॉल किंवा त्याच्या टीमकडून याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, तर दुसरीकडे तनाज इराणी या छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे. इन्स्टाग्रामवरून तिने आपल्या तब्येतीची माहिती दिली. तनाजने पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे रिपोर्ट् कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मी देवाकडे प्रार्थना करेन की, माझ्यासोबतच्या इतर कोणालाही कोरोनाची बाधा होऊ नये. कोरोना झाल्यावरही ती सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे.

तर दुसरीकडे वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) च्या फिल्म ‘जुग-जुग जियो’ च्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच वरुण धवन, नीतू कपूर यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. तसेच फिल्मचे दिग्दर्शक राज मेहतादेखील पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे सिनेमाचे शूटिंग थांबवले होते. त्यानंतर आता अभिनेता मनीष पॉललाही (Manish Paul) कोरोना झाला आहे. त्यामुळे शूटिंग लांबणीवर पडणार आहे. दरम्यान, आजच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिव्या भटनागर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.