‘जाहीरनामा’ म्हणजे पाकिस्तानच्या योजनांचा कट ; असे ढकोसलापत्र(जाहीरनामा) पवारांना मान्य आहे का ?

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचा जाहीरनामा ढकोसलापत्र आहे. काँग्रेसचे हे ढकोसलापत्र(जाहीरनामा) शरद पवारांना मान्य आहे का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर, शरद पवारांना याचं उत्तर द्यावचं लागेल असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करू असे आश्वासन काँग्रेसने आपल्या
जाहीरनाम्यात दिले आहे. त्यावरून नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या गोंदिया येथील प्रचार सभेत ते बोलत होते. राज्यातील ही त्यांची दुसरी सभा आहे.

‘काँग्रेसचा हा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या योजनांचा कट’

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, “काँग्रेसचा जाहीरनामा हा जवानांचा अपमान आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या योजनांचा कट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा शहरी नक्षलवादाला पाठिंबा आहे म्हणूनच त्यांनी देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचा घेतलेला निर्णय तुम्हाला मान्य आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, “शरद पवार यांनी स्वत: संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. देशद्रोहाच्या कलमात बदल करणे म्हणजे देशाच्या सुरक्षेसोबत खेळ करण्यासारखं आहे. मी शरद पवार यांना विचारू इच्छितो की काँग्रेसच ढकोसलापत्र (जाहीरनामा) स्वत: शरद पवार यांना तरी मान्य आहे का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. इतकेच नाही तर, शरद पवारांना याचे उत्तर द्यावेच लागेल असेही मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी मोदींनी युपीए सरकारवर सडकून टीका केली. “युपीए सरकारच्या काळात देशातील जवान आणि देशातील शेतकरी चिंतेत असायचे” असेही ते म्हणाले. माझी पाच वर्षे युपीए सरकारने केलेल्या चुका सुधारण्यात गेली असा घणाघातही मोदींनी यावेळी केला.