काँग्रेसला मोठा धक्का ; ‘हा’ जेष्ठ नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नंदुरबारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. मुलाला उमेदवारी नाकारल्याने ते पक्षावर नाराज आहेत. ३० तारखेला होणाऱ्या मेळाव्यात अपक्ष उभं राहायचं की भाजपला पाठिंबा द्यायचा, यावर निर्णय घेणार असल्याचं माणिकराव गावित यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

माणिकराव गावित म्हणाले की, ‘भरत गावित चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले, त्यांनी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं, त्यामुळे तरुणांनाही त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, मात्र इतकी वर्ष काम करुन आपल्या मुलाला तिकीट दिले नाही. पक्षाच्या या निर्णयावर मी नाराज आहे. ३० तारखेला होणाऱ्या मेळाव्यात अपक्ष उभं राहायचं की भाजपला पाठिंबा द्यायचा, यावर निर्णय घेण्यात येईल.’

निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मुलगा भरत गावित यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसचे माजीमंत्री माणिकराव गावित हे दिल्लीत तळ ठोकून होते. मात्र काँग्रेसकडून नवापूरचे विद्यमान आमदार ॲड के. सी. पाडवी यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे भरत गावित नंदुरबार लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. उत्तर महाराष्ट्रातील मोठे नेते असलेल्या माणिकराव गावितांच्या बंडाचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो. माणिकराव गावित सलग आठ वेळेस काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.

नंदुरबारमध्ये भाजपने विद्यमान खासदार हीना गावित यांना पुन्हा संधी दिली आहे, तर काँग्रेसने त्यांच्याविरोधात के. सी. पाडवी यांना उमेदवारी दिली आहे.