ड्रग्ज प्रकरणात आरोपी सुटल्याने महिला पोलीस अधिकार्‍यांनी केली ‘ही’ कृती देशातील पहिलीच घटना

इंफाळ : मणीपूरमधील ड्रग्ज प्रकरणात एनडीपीएस न्यायालयाने तपासावर ताशेरे ओढत भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्षांसह ७ जणांची निर्दोष सुटका केली. यानंतर मणिपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक थौना ओजम बृंदा यांनी आपल्याला मिळालेले वीरता पदक परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एन बीरेने सिंह यांना लिहिले आहे. एखाद्या पोलीस अधिकार्‍याने न्यायालयाच्या निर्णयानंतर पदक परत करण्याचा हा देशातील पहिलीच घटना आहे. बृंदा यांना मादक पदार्थाच्या विरोधात केलेल्या कारवाईबद्दल राज्य सरकारने देशभक्त दिवसानिमित्त १३ ऑगस्ट २०१८ रोजी मुख्यमंत्री पोलीस पदक देऊन त्यांचा गौरव केला होता.

बृंदा यांनी केलेल्या एका कारवाईत मोठ्या प्रमाणाार ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यात भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लुखोशी व इतर ६ जणांना आरोपी करण्यात आले होते. या कारवाईचे संपूर्ण मणिपूरमध्ये जोरदार स्वागत झाले होते. त्याबद्दल राज्य सरकारने बृंदा यांना पोलीस पदक देऊन गौरवही केला होता.

एनडीपीएस कोर्टाने भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लुखोशी आणि अन्य ६ जणांची निर्दोष सुटका केली आहे. आरोपींना निर्दोष सोडतानाच न्यायालयाने निकालपत्रात तपासावर ताशेरे ओढले.

यानंतर बृंदा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून त्यात पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोर्टाने या प्रकरणात तपास आणि अभियोजन कामकाजाला असंतोषजनक म्हटले आहे. देशातील न्याय प्रणालीच्या इच्छानुसार आपण आपली ड्युटी केली नाही. त्यामुळे या सन्मानाला आपण स्वत: ला लायक समजत नाही. त्यामुळे राज्य गृह विभागाकडे हे पदक आपण परत करत आहोत. त्यामुळे शासन हे पदक अधिक योग्य पोलीस अधिकार्‍याला देऊ शकेल.