‘गर्लफ्रेंड’ला भेटण्यासाठी क्वारंटाइन सेंटरमधून पळाले अन् येताना गांजा-दारु घेऊन आले

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाचा कहर संपुष्टात आणण्यासाठी ठिकठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. मात्र, आजारामध्ये आराम करण्याऐवजी क्वारंटाइन सेंटरमध्ये काही लोक नाचत आहेत, तर काही जणांचे क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण मणिपूरच्या क्वारंटाइन सेंटरमधून वेगळीच घटना समोर आली आहे. तामेंगलाँग क्वारंटाइन सेंटरमधून दोन तरुणांनी प्रेयसींना भेटण्यासाठी पलायन केले होते. त्यानंतर थोड्या वेळाने ते परतले. तर त्यांच्याकडे गांजा, सिगारेट आणि दारुच्या बाटल्या होत्या.

क्वारंटाईन सेंटरमधून दोन तरुण पळाले आणि परत आले तरी कोणाला याबाबत माहिती नव्हती. मात्रा, सेंटरमध्ये राहणार्‍या इतर व्यक्तींना दारु, सिगारेट आणि गांजाचे वाटप करताना अधिकार्‍यांनी त्यांना पकडल्यानंतर घटना उघडकीस आली. तामेंगलाँगचे जिल्हा दंडाधिकारी आर्मस्ट्राँग पाम यांनी या घटनेविषयी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली. ‘हे दोघे प्रेयसीला भेटण्यासाठी पळाले होते. बाइकवरुन परत आल्यानंतर त्यांच्याकडे 8 लीटर देशी दारु, चार पॅकेट गांजा आणि सिगारेटची पाकीटे होती. या दोघांना आणि यांच्यासारख्या लोकांना काय शिक्षा द्यावी हे कळत नाही. जिल्हा प्रशासनाकडून त्यांना तुरुंगात पाठवले जाणार होते . पण कोरोनामुळे तुरुंग बंद आहेत’, अशी पोस्ट पाम यांनी केली आहे. सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे. पण, देशात क्वारंटाइन केंद्रांमध्ये किती गैरव्यवस्था आहे यावर मणिपूरच्या घटनेने पुन्हा प्रकाश टाकला आहे.