काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरूच : ‘या’ ठिकाणच्या १२ आमदारांनी दिले राजीनामे

इंफाळ : पोलिसनामा ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण असून पक्षामध्ये राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. मणिपूरमधील एक नव्हे तर तब्बल १२ आमदारांनी काँग्रेस कमिटीतील त्यांना असलेल्या विविध पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यांनी पक्षाकडे राजीनामे देत आम्ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अनुकरण करत असल्याचे म्हंटले आहे. मणिपूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गैखंगम यांच्याकडे पक्षाच्या १२ आमदारांनी राजीनामे दिले आहेत.

या संदर्भात आमदारांनी म्हंटले आहे कि, आम्हाला काँग्रेसची काहीच अडचण नाही. आम्ही केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे अनुकरण करत असून आमच्या राजीनाम्याचे हेच कारण आहे. सर्व आमदारांकडे पक्षाच्या विविध पदांची जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात मोठ्या प्रमाणात पराभव पत्कारावा लागला. राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारत स्वतःच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. मात्र काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. दरम्यान मणिपूरमध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला आहे.

मणिपूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष गैखंगम यांनी म्हंटले आहे की, माझ्याकडे काही सहका-यांनी राजीनामे सोपवले आहेत, मात्र मी अजुनही कोणत्याही पत्रकावर स्वाक्षरी केलेली नाही. राहुल गांधींनी पक्षाला मजबूत करण्याच्या उद्देशाने राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी स्तरावर देखील आम्हाला याचे पालन करावे लागेल. काँग्रेस कार्यकारणी समितीच या १२ आमदारांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय घेईल.