‘मांजा’ क्षणिक आनंदासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (सुप्रिया थोरात) – मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंग उडविण्याची परंपरा असून, हा उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो. मकरसंक्रांतीला  सर्वांना वेध लागतात ते पतंग उडविण्याचे. पण नायलॉनच्या मांज्यामुळे पतंग उडवण्याचा हा उत्सव जीवघेणा ठरतोय. मांजात पक्षी अडकल्याने जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे तर हवेत तरंगणारा मांजा दुचाकीवरून जाणाऱ्यांचा चेहरा, गळ्याभोवती आवळला गेल्याने अनेकजण जखमीही झाले आहेत तर काही जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत.
क्षणिक आनंदासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात-
सध्या सुती धाग्यापेक्षा नायलॉन मांजाला नागरिकांची जास्त पसंती असल्याचे पतंग विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र स्वतःच्या क्षणिक आनंदासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणं प्रत्येकाने टाळायला हवं. पूर्वी पतंग उडवण्यासाठी साध्या सुती दोऱ्याचा वापर केला जात होता. मात्र हा दोरा तुटत असल्याने आणि स्पर्धेत विरोधकांचा पतंग कापण्यासाठी आणि आपला पतंग सुरक्षित राहण्यासाठी चीनी, नायलॉनच्या मांजाचा वापर वाढला. नायलॉनच्या दोऱ्यावर डिंकाचा वापर करून काचेचा चुरा लावण्यात येतो. हा दोरा सहजासहजी तुटत नाही. हा दोरा दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती अडकल्यास गळा चिरण्याचा धोका असतो. तसेच मांज्यामध्ये पक्षी अकडल्यास त्याची सुटका सहजासहजी होत नाही. बाजारात मिळत असलेल्या चीनी मांजा आणि नायलॉन मांजा विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन करुन याची सर्रास विक्री केली जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मोकळी मैदानच नाहीत पतंग उडवण्यासाठी छतांना पसंती 
वाढत्या शहरीकरणामुळे पतंग उडवण्यासाठी  शहरात मोकळी मैदाने नसल्यामुळे मोकळ्या जागा न उरल्यामुळे घर व इमारतींच्या छतांवरून पतंग उडविण्यास सुरवात झाली. मग अशा वेळेला हे पतंग कुठेतरी विद्युत वाहिन्यांवर झाडांवर, घरांवर अडकतात अशा पतंगाना नॉयलॉन मांजा असेल तर त्याद्वारे नागरिक आणि पक्षी जखमी होतात.
मांज्यामुळे पुणे जिल्ह्यात घडलेले अपघात
१) दुचाकीवरून जाणाऱ्या ऐश्वर्या निंबाळकर या युवतीच्या चेहऱ्यावर मांजा कापल्याने तिला १२ टाके पडले. नाक आणि डोळ्याभोवती गंभीर जखमा झाल्या.
२) वडणगे येथील गजेंद्र नरदेकर या तरुणालाही मांजा कापल्याने तोही जखमी झाला होता.
३) नाशिक फाटा उड्डाणपुलावर डॉ. कृपाली निकम या २६ वर्षाच्या तरुणीचा दुचाकीवरून जातात मांजाने गळा चिरला. त्यात तिचा मृत्यू झाला.
४) सुवर्णा मुजूमदार या सुमारास पुणे महापालिकाभवनाकडे जाणाऱ्या शिवाजी पुलावरून दुचाकीवर घरी जात होत्या. त्यावेळी मांजा गळ्याभोवती गुंडाळून गळा कापल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
५)पिंपरीतील काळेवाडी लटकणारा मांजा एका चिमुकल्याच्या डोळ्यात घुसल्याने त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे.
६) विमाननगर येथे देखील वकिलाच्या गळ्याला मांजा लागून गळा चिरला होता तर त्यांच्या झालेल्या अपघातात ते आणि त्यांचा मुलगा थोडक्यात बचावले होते.
पतंग उडवण्याच्या प्रथेमागचं कारण –
मकरसंक्रांतीला पतंग उडवणे आरोग्यास लाभदायक असते. तसेच सकाळच्या वेळेस पतंग उडवला तर ऊर्जा मिळते. यासोबत व्हिटॅमिन डी मिळते, ऊन्हामुळे आणि थंडीमुळे त्वचेच्या समस्यांपासूनही सुटका मिळते, असं म्हटलं जातं. जुन्या काळी सकाळच्या वेळी अंघोळ वगैरे करून पतंग उडवण्याची पद्धत होती. जेणेकरून त्वचेशी कोवळ्या सूर्यकिरणांचा संपर्क यावा. सूर्याची कोवळी किरणे म्हणजे ड जीवनसत्वाचा स्त्रोत! पतंग उडवताना सण साजरा करत आरोग्य राखले जावे म्हणून ही पद्धत आहे.
पतंगाला स्वतंत्र्य, आनंद आणि शुभ संदेशाचे प्रतीक मानलं जातं. तसेच पतंग उडवल्याने मानसिक तणाव संतुलित राहतो आणि मन प्रसन्न राहते असं म्हटलं जातं.
नायलॉन मांजावर बंदी-
नायलॉन मांजाचा पक्षांना व मानवाला असणारा धोका लक्षात घेता शासनाने त्याच्या विक्रीला बंदी घातली असुन राज्य शासनाने ही अधिसूचना पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार जारी केली आहे. पेटा या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या मांजावर बंदीसाठी याचिका देखील दाखल केली होती. पेटा ने सरकारच्या प्राणी कल्याण मंडळाला मांजावर बंदीसाठी देखील आवाहन केले होते. तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला देखील यावर बंदी साठी आवाहन केल्याने त्यानंतर राज्यसरकारने आदेश पारित करून नायलॉन मांजावर बंदी टाकली आहे. नायलॉन मांजामुळे पक्षी, पशू आणि माणसंही दगावल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे त्यावर बंदीचा निर्णय झाला.
बंदी कागदावर, मांजा जिवावर-
राष्ट्रीय हरीत लवादाने चायनीज मांजावर बंदी आणावी अशी याचिका गुजरात उच्च न्यायालयासमोर २०१४ मध्ये दाखल केली होती. त्याला गुजरातच्या काही व्यापाऱ्यांनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही बंदी कायम ठेवत २०१७ मध्ये नायलॉन विक्रीवर पूर्णपणे बंदी आणली होती.  मात्र, त्याची अंमलबजावणी कठोरपणे होताना दिसत नाही.

नायलॉन  मांजा हा धोकादायक असून यावर बंदी आलेली असताना ही त्याचा सर्वत्र सर्रास वापर केला जात असल्याचे दिसत आहे. संक्रांतीनिमित्त लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच पतंग उडविण्याचा मोह होत असतो. परंतु उत्साहाच्या भरात पाहिजे ती सुरक्षेची काळजी न घेतल्याने परिणामी अपघातांना आमंत्रण मिळते. एनजीटी’ने बंदी घालूनही आदेशाची अंमलबजावणी गांभीर्याने केली जात नाही. त्यामुळे पशू-पक्ष्यांसह  नागरिकांचा यात नाहक जीव जात आहे तसेच जखमींची संख्या जास्त आहे. मांजामुळे एखादी दुर्घटना घडली तर मांज्यावर बंदी ची मागणी व कारवाई जोर धरते मात्र नव्याचे नऊ दिवस’ ठरल्याने पुन्हा नायलॉन मांजा विक्री खुलेआम सुरु होते.