मांजरा धरण 83 % भरलं ! लातूर, बीड अन् उस्मानाबाद जिल्हयातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   कायम दुष्काळाच्या छायेत राहणा-या मराठवाड्यात यंदा परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरण 83 टक्के भरले आहे. यामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद तीन जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा देखील प्रश्न सुटला आहे.त्यामुळे शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मे महिन्याच्या अखेरीस मांजरा धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे जुन महिन्यात पाणी साठा वाढण्यासाठी दमदार पावसाची अपेक्षा होती. या धरणावर लातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, कळंब, धारूर आदी शहरासह अनेक गावे अवलंबून आहेत. जुनपासून समाधानकारक पाऊस झाला. पण नदी, विहीरी, नाले भरण्यास तीन महिने लागले. मांजरानदीवर असलेला बंधारा तसेच या नदीला मिळणा-या उपनद्यावरील बंधा-यामुळे मांजरा भरून वाहनण्यास तीन महिने लागले. सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर असल्याने नदी, नाले भरले. नदी पात्रातून पाणी धरणात वाढत गेले. गेल्या दिड महिन्यात धरणात 126 दलघमी पाणीसाठा वाढला. त्यामुळे धरण 83.58 टक्के भरले आहे. धरणात 187.308 दलघमी पाणीसाठा आहे. पाऊस सुरुच असल्याने धरण भरण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.