माजी जि. प. अध्यक्ष मंजुषा गुंड भाजपच्या वाटेवर, रोहित पवार यांना मोठा धक्का ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार हे निवडणूक रिंगणात असल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मंजुषा गुंड व त्यांचे पती राजेंद्र मुंडे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास रोहित पवार व पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसणार आहे.

रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत असल्याने मंजुषा गुंड व त्यांचे पती नाराज आहेत. राजेंद्र गुंड हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अजित पवार हे रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातील अनेक कार्यक्रमांना दांडी मारत आहेत. यातून अजित पवार व रोहित पवार यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यातच मंजुषा गुंड या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्याने रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

रोहित पवार यांच्या अडचणीत मोठी भर पडणार असल्याने पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. विधानसभेत जाण्यास असलेल्या रोहित पवार यांना गुंड यांचा राजकीय निर्णय मोठा अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे पवार कुटुंबियांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली असून, त्यांच्याकडून गुंड यांची मनधरणी सुरू आहे. गुंड यांचे कर्जत तालुक्यात मोठे प्रस्थ आहे. त्यामुळे त्यांचे भाजपात जाणे राष्ट्रवादीसाठी मोठे अडचणीचे ठरणार आहे.

Visit – policenama.com