‘या’ कारणामुळं सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना बनवलं होतं पंतप्रधान, बराक ओबामांनी सांगितलं

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी आपल्या पुस्तकात ‘अ प्रॉमिस्‍ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकात काँग्रेससंदर्भात अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. याच पुस्तकात त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नर्व्हस विद्यार्थी म्हटले आहे, तर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांची जबरदस्त प्रशंसा केली आहे. एवढेच नाही, तर सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यामुळेच मनमोहनसिंग पंतप्रधान झाले होते, असेही त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.

ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे, की ‘सोनिया गांधी यांनी पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग यांची केलेली निवड योग्य होती, असे अनेक राजकीय अभ्यासकांचे म्हणणे होते. कारण, मनमोहनसिंग हे वृद्ध होते, तसेच त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा राष्ट्रीय राजकीय आधार नव्हता. त्यामुळे त्यांच्यापासून सोनिया गांधी यांचा 40 वर्षीय मुलगा राहुल यांना कसल्याही प्रकारचा धोका नव्हता. सोनिया गांधी या राहुल गांधींना काँग्रेस पक्ष सांभाळण्यासाठी तयार करत होत्या असे म्हटले आहे.

ओबामा यांनी त्यांच्या या पुस्तकात डॉ. मनमोहनसिंग यांच्या घरी झालेल्या डिनर पार्टीचाही उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे, की ते जेव्हा मनमोहनसिंग यांच्या घरी डिनर पार्टीसाठी गेले, तेव्हा त्या ठिकाणी सोनिया गांधी आणि राहुल गांधीही उपस्थित होते. सोनिया गांधींसंदर्भात लिहिताना ओबामा यांनी म्हटले आहे, त्यावेळी त्यानी कमी बोलून अधिक ऐकनेच पसंत केले. मात्र, जेव्हा धोरणात्मक विषयांवर बोलायला सुरुवात झाली, तेव्हा त्यांनी सावधपणे मनमोहनसिंग यांना वेगळे ठेवले आणि आपल्या मुलासंदर्भातील (राहुल गांधी) चर्चा पुढे सुरू ठेवली.

राहुल गांधी हे एक नर्व्हस आणि अपरिपक्व व्यक्ती
बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत उल्लेख करतान म्हटले आहे की, राहुल गांधी हे एक नर्व्हस आणि अपरिपक्व व्यक्ती आहेत. एखादा विद्यार्थी जसा आपला अभ्यास करून शिक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याच्यामध्ये त्या विषयात प्रावीण्य मिळवण्याची पात्रता नसते किंवा त्या विषयाबाबत आवडीचा अभाव असतो, तसे त्यांच्याबाबत घडत आहे. याबरोबरच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा उल्लेख करत, ते एक अपार निष्ठा बाळगणारी व्यक्ती आहेत, असे ओबामा यांनी म्हटले आहे.

बराक ओबामा हे 2017 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांची आणि राहुल गांधी यांची भेट झाली होती. बराक ओबामा यांच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत उपयुक्त चर्चा झाली. त्यांना पुन्हा एकदा भेटणे हा चांगला अनुभव होता. बराक ओबामा यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये ड्रिम्स फ्रॉम माय फादर, द ऑडेसिटी ऑफ होप आणि चेंज वी कॅन बिलिव्ह इन यांचा समावेश आहे.