सेवा संगम प्रदर्शनातून देण्याचा भाव जागृत होईल, संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांचा विश्वास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – समाजासाठी सेवावृत्तीने सुरू असलेली अनेक कामे ‘सेवा संगम’ प्रदर्शनात पहायला मिळत असल्यामुळे हे प्रदर्शन पाहणाऱ्यालाही सेवा कार्य करण्याची निश्चित प्रेरणा मिळेल.त्यातून समाजासाठी काहीतरी देवूया हा भावही जागृत होईल. असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केला.

रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवा विभागातर्फे आयोजित सेवा संगम या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ, श्री. वैद्य, महापालिकेचे स्वच्छता सेवादूत महादेव जाधव आणि विश्वसुंदरी, प्रसिद्ध अभिनेत्री युक्ता मुखी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्य बोलत होते. उपमहापौर सरस्वती शेंडगे, संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व्यासपीठावर उपस्थित होते. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील १२५ संस्था या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. संघाबरोबरच रा. स्व. संघ जनकल्याण समिती, सेवावर्धिनी, सेवा सहयोग, समर्थ भारत आणि स्पार्क या संस्थांनी या प्रदर्शनाचे संयोजन केले आहे.

शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, महिला सक्षमीकरण, रोजगार, स्वावलंबन, संस्कार अशा विविध क्षेत्रात कोणकोणती समाजोपयोगी कामे सुरू आहेत, त्यांची माहिती या प्रदर्शनातून पहायला मिळत आहे.
जगभरात सेवा प्रकल्प सुरू असतात. पण, भारतातील सेवा प्रकल्पांना आध्यात्माचे अधिष्ठान असल्याने त्यांचे महत्त्व वेगळे आहे. आम्ही समाजाला काही तरी देऊ असा विश्वास सेवा प्रकल्प राबविणाऱ्या संस्थांमधून निर्माण झाला आहे, असे वैद्य यांनी यावेळी सांगितले. आध्यात्मिक संस्कारांमुळे स्वत:तील ‘मी’ पणा कमी होऊन, सामाजिक भावनेला मोठे स्थान मिळते. सेवा करणे हा आपला धर्म असल्याने आपल्या बांधवांसाठी आणि समाजासाठी कार्य करण्याची आपली वृत्ती आहे. यातून समाजाचा सेवा धर्म आणखी वाढला पाहिजे, असेही ते म्हणाले.

संघाच्या माध्यमातून पुण्यात सुरू असलेल्या सेवा कार्यांच्या माध्यमातून नागरिकांचे आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेंद्र बोरकर यांनी, सूत्रसंचालन विनित कोंडेजकर यांनी आणि आभार प्रदर्शन अनिल व्यास यांनी केले. गणेश कला क्रीडा मंच येथे हे प्रदर्शन रविवारी (१८ जानेवारी) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत खुले राहणार आहे.

स्वच्छतादूत जाधव यांना दाद
महापालिकेने स्वच्छतादूत म्हणून घोषित केलेले महादेव जाधव यांचा उद्घाटन कार्यक्रमात मनमोहनजी वैद्य यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. जाधव यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे एक स्वरचित गीत यावेळी सादर केले आणि उपस्थितांकडून त्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली.

प्रदर्शनात काय काय
सव्वाशे संस्थांचे सेवा प्रकल्प पाहण्याची संधी
पारंपरिक कलांचे सादरीकरण
सेवा कट्ट्यावर विविध विषयांवर चर्चा, गप्पा, प्रश्नोत्तरे
विविध चवींचे खाद्यपदार्थ

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like