२३ मे ला जनतेची ‘मन की बात’ समोर येईल ; शिवसेनेचा भाजपाला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मित्रपक्ष भाजपवर आश्वासनांच्या घोषणांवरून निशाणा साधला आहे. शिवाय, काँग्रेससहीत अन्य विरोधी पक्षांवरही त्यांनी टीका केली आहे. राम मंदिर , काश्मीर प्रश्नावरून जनतेला उत्तर देण्याची तयारीही ठेवा असे त्यांनी भाजपाला सुनावले आहे.

काश्मीरमध्ये शांतता व अयोध्येत राम मंदिर उभारू ही घोषणा २०१४ मधील निवडणुकीत भाजपाला मोठे यश देऊन गेली. पण दोन्ही विषय २०१९ सालात आहे तसेच असून या मुद्द्यांवर आता जनता प्रश्न विचारणार, तेव्हा त्याची उत्तरे देण्याची तयारी भाजपाने ठेवायला हवी, असे म्हणत शिवसेनेने भाजपाला चिमटा काढला. आतापर्यंत पंतप्रधान मोदी हे ‘मन की बात’ करून देशवासीयांशी संवाद साधत होते. २३ मे रोजी जनतेची ‘मन की बात’ समोर येईल, असे शिवसेनेने म्हटले आहे. आता जनता प्रश्न विचारणार, तेव्हा त्याची उत्तरे देण्याची तयारी भाजपने ठेवायला हवी, असेही यात म्हटले आहे.

सामनाच्या अग्रलेखातील मुद्दे –

निवडणुकीसाठी आचारसंहिता जारी झाली असून आता निवडणुकीच्या जंगी कार्यक्रमात सहभागी होऊन जनतेने देशाचे भवितव्य ठरवावे, असे आवाहन अग्रलेखात करण्यात आले आहे. महाराष्ट्र, गोवा, हरयाणात मुदतपूर्व निवडणुका होतील अशा पुड्याही सोडल्या गेल्या. त्या पुड्या रिकाम्या निघाल्या, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणे शक्य नाही-

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात ही भूमिका पंतप्रधान सातत्याने मांडत होते. मोदी यांची भूमिका चुकीची नव्हती, पण या महाकाय देशात ते शक्य आहे काय? अनेक राज्यांत मोदी यांचा विचार न मानणारी सरकारे आहेत. ती वेळेआधीच बरखास्त करावी लागली असती व त्यातून मोठा गोंधळ निर्माण झाला असता. निवडणुका एकत्र झाल्यास आर्थिक ओझे कमी होईल हे खरे असेलही, पण एखाद्या राजकीय पक्षाच्या सोयीसाठी हे सर्व घडू नये. इतकीच आमची अपेक्षा होती.

पुलवामा हल्ला, त्यानंतर पाकव्याप्त कश्मीरवरील हवाई हल्ला व त्यातून निर्माण झालेली परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी हवा निर्माण करण्यात आली होती. मोदी हे मनमानी करतील व सत्ता आपल्याच हाती ठेवतील असे विरोधक बोलत होते, पण तसे झाले नाही.

जनता सुज्ञ आहे. तिला फार काळ मूर्ख बनवता येत नाही –

जनता सुज्ञ आहे. तिला फार काळ मूर्ख बनवता येत नाही, असे देशाचा इतिहास सांगतो. जनतेच्या मनातही प्रश्न असतात व मतपेटीद्वारे ती त्या प्रश्नांची उत्तरे शोधत असते. ‘ईव्हीएम’विषयी मतदारांच्या मनात संभ्रम आहेच. जगातील सगळ्याच राष्ट्रांनी ईव्हीएम वापरणे बंद केले; कारण त्या यंत्रणेत दोष आहेत व पैशांच्या बळावर त्या मशीनवर नियंत्रण ठेवणे शक्य असल्याचे उघड झाल्यावरही फक्त हिंदुस्थानातच ‘ईव्हीएम’चा हट्ट का? हा प्रश्न आहे, पण यंदा सर्व मतदान केंद्रांवर ‘व्हीव्हीपॅट’ची सुविधा असेल. त्यामुळे मशीनचे बटन दाबल्यावर मत कोणाला गेले ते समजेल.

ह्याहि बातम्या वाचा –

नक्की काय आहे पवार-विखे पाटील वाद ? सर्वोच्च न्यायालयाचा तो खटला आठवत असेल : शरद पवार

लोकसभेच्या उमेदवारीसाठी अखेर सुजय विखे-पाटील यांचा भाजपात प्रवेश