Mann Ki Baat : PM मोदींचे देशवासियांना केले आवाहन, म्हणाले – ‘लशीसंदर्भातील कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका, लसीकरणाचा लाभ घ्या’

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी (दि. 25) मन की बातच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना आज आपल्या सर्वांचे धैर्य अन् दुःख सहन करण्याच्या क्षमतेची परीक्षा घेत आहे. अशावेळी मी आपल्याशी मन की बातच्या माध्यमातून संवाद साधत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशात एक आत्मविशास संचारला होता. मात्र, या दुसऱ्या लाटेने देशाला मोठा धक्का दिला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला आरोग्य तज्ज्ञ आणि त्यांनी दिलेल्या सूचनांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. दरम्यान मन की बात हा पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमांचा 76 वा भाग होता.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, येत्या 1 मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे. कोरोनाच्या संकटात लसीचे महत्व सर्वांना कळाले आहे. त्यामुळे लसीच्या बाबतीत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. केंद्रांकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य कोरोनावरील लस पुरवली आहे. तसेच नागरिकांनी आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल, तर आपण केवळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. फॅमिली डॉक्टर्स किंवा तुमच्या जवळच्या डॉक्टर्सचा सल्ला घ्या. मी पाहत आहे, की अनेक डॉक्टर्स यासंदर्भात जबाबदारी स्वीकारत आहेत. अनेक डॉक्टर्स सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेला माहिती देत आहेत. दरम्यान यावेळी पंतप्रधानांनी काही डॉक्टरांशी संवाद साधला. तसेच त्यांनाही देशवासियांशी संवाद साधायला सांगितले. मुंबईच्या लिलावती रुग्णालयातील डॉक्टर शशांक जोशी आणि श्रीनगरचे डॉ. नाविद यानी जनतेशी संवाद साधला.