ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपांना PM मोदींचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१४ च्या निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचे एका आंतरराष्ट्रीय हॅकर ने सांगितले त्यानंतर देशभरात एकाच खळबळ माजली पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र आता याबाबतीत मोदींनी अखेर मौन सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज निवडणूक आयोगाचं कौतुक करत अप्रत्यक्षपणे त्यांना प्रत्युत्तर दिलं. निवडणूक आयोग ही देशातील सर्वात जुनी संस्था आहे, असं ‘मन की बात’ मधून मोदी म्हणाले. मोदींनी आज ५२ व्या ‘मन की बात’ मधून जनतेशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून जनतेशी संवाद साधला. मोदींनी ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्याला अप्रत्यक्षपणे हात घालत निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे मतदान घेण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. निवडणूक आयोग ही देशातील सर्वात जुनी संस्था आहे. भारत प्रजासत्ताक होण्यापूर्वी निवडणूक आयोग स्थापन झाला. या निमित्ताने दरवर्षी मतदार दिन साजरा केला जातो. निवडणूक आयोगाची कामगिरी कौतुकास्पद आहे. लोकशाहीला बळकट करण्याचे काम आयोग करत आहे. या वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. २१व्या शतकात जन्मलेले तरुण पहिल्यांदाच या निवडणुकीत मतदान करतील. यामुळे तरुण मतदारांनी मतदानासाठी पुढे यावं. मतदार नाव नोंदणी करून घ्यावी. मतदान हे आपले कर्तव्य आहे, अशी भावना प्रत्येक तरुणाची असली पाहिजे, असं मोदी म्हणाले.

भारतात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅकिंग झालं होतं. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकीतही ईव्हीएममध्ये फेरफार केले गेले’, असा दावा सय्यद शुजा या अमेरिकन सायबर एक्स्पर्टने लंडनमधील ‘ईव्हीएम हॅकेथॉन’ मध्ये केला होता. तसंच ईव्हीएम हॅकिंगबाबत माहीत असल्यानेच बभ्रा होऊ नये म्हणून भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली, असं खळबळजनक वक्तव्यही शुजाने केलं होतं. यावरून देशात राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यरोप होत आहेत. विरोधकांनी मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी केली आहे. तर निवडणूक आयोगानेही मतपत्रिकेद्वारे नव्हे तर ईव्हीएमद्वारेच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेतले जाईल, अशी ठाम भूमिका मांडली. या पार्श्वभूमीवर मोदींची आज ‘मन की बात’ झाली.

पुण्यातील आकाश गोरखाचेही कौतुक

पुण्यात झालेल्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धांचा उल्लेखही मोदींनी केला. पुण्यातील ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धांमध्ये ६ हजार खेळाडूंनी भाग घेतला. यावेळी या स्पर्धांमध्ये प्रत्येक राज्याने आपआपल्या पातळीवर उत्तम प्रदर्शन केले, असं मोदी म्हणाले. पुण्यातील एका सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाचा मुलगा आकाश गोरखा याने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये रौप्य पदक जिंकले. त्याच्या या कामगिरीचे मोदींनी कौतुक केले. अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताची वेगाने प्रगती सुरू आहे. अंतराळ योजनांमुळे तरुण शास्त्रज्ञांनी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. २४ जानेवारीला विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह ‘कलाम सॅट’ अंतराळात झेपावला. तसंच अंतराळ मोहीमेतून भारत चंद्रावर लवकरच आपली मोहोर उमटवेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.