शरद पवारांनी माझी जात कधी काढली नाही, पण… : मनोहर जोशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी चार वर्षे राज्याचा मुख्यमंत्री असताना शरद पवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्या काळात मी ब्राम्हण असल्याचा संदर्भ देत त्यांनी माझ्यावर कधीही टिका केली नाही. मात्र, अलिकडे काही बाबतीत ते सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जातीवरुन बोलत असतील तर ते अयोग्यच आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिरसंधान साधले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार जातीयवादी असल्याचे व ते आपल्या जातीवरुन बोलत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत मनोहर जोशी यांनी आपल्याला तसा अनुभव नसल्याचे सांगितले.

पवार यांनी जातीवरुन माझ्यावर कधीही टिका केली नाही. फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे पवार अशी काही वाक्ये बोलत असतील तर ते अयोग्य आहे. मात्र, एखादे वाक्य उच्चारले म्हणून ते जातीयवादी ठरत नाही. शिवसेनेने कधीही जातीयवाद केलेला नाही, असे जोशी यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्या सभेविषयी बोलताना ते म्हणाले, सध्याच्या राजकारणात राज हे एकमेव टेन्शन फ्री राजकारणी आहेत. त्यांना कोणाला निवडून आणायचे नाही. बघु या काय होते ते ? सध्या ते ज्यांना मदत करताहेत. त्यांना निवडणुकीनंतर काय मागतात आणि समोरचे काय देतात यावर राजकारण ठरेल.

राज यांच्या भाषणाची स्क्रीप्ट बारामतीत लिहिली जाते. असे मुख्यमंत्री म्हणत असले तरी पवार आणि माझी मैत्री तुटेल त्या दिवशी मी या स्क्रीप्टबाबत उत्तर देईल. पवारांचा हा राज फॉर्मुला निवडणुक निकालाने सिद्ध झाले तर असे फॉर्मुले घेण्यासाठी सगळ्यांनी बारामतीला जाऊन रहावे, असा सल्ला मी देईन, अशी हसत हसत त्यांनी टिप्पणी केली.