मनोरंजन संस्थेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष, मनोरंजन संस्थेचे संस्थापक -संचालक आणि ज्येष्ठ रंगकर्मी मनोहर चिंतामण कुलकर्णी (वय ९२) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे मोहन, मदन ही दोन मुले, मीना ही कन्या, सून, नातवंडे असा परिवार आहे.

मनोहर कुलकर्णी यांचा जन्म ३ जानेवारी १९२८ मध्ये झाला होता. ते अण्णा या नावाने प्रसिद्ध होते. १९५० पासून त्यांनी हौशी नटसंघ सरस्वती मंदिर नटसंघात काम केले. १९६१ मध्ये पुण्यात खुले नाट्यगृहाची सुरुवात करण्यात त्यांचा सहभाग होता. १९७० पासून त्यांनी मनोरंजन या नाट्यसंस्थेची स्थापना केली. हौशी व इतर नाट्य संस्थांना नाटकासाठी स्टेज मटेरियल डेकोरेशन तयार करुन पुरविण्याचे कार्य ते आतापर्यंत करत होते. गेल्या ५० वर्षांपासून ते सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना २००० साली शासनाचा सांस्कृतिक पुरस्कर देण्यात आला होता. मनोरंजन संस्थेचे संचालक मोहन कुलकर्णी यांचे ते पिता होत.