गोव्यात भाजप नव्या मुख्यमंत्र्यांच्या शोधात

पणजी : वृत्तसंस्था – मागील आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धाडसाने तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटवणारे मनोहर पर्रिकर यांचे आज निधन झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रात्री आठच्या सुमारास अधिकृत निधनाचे वृत्त दिले. वयाच्या ६४ व्या वर्षी पर्रिकरांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.

पर्रीकर यांच्या निधनानंतर उत्तराधिकारी निवडण्यासाठी आता भाजपने तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत ही दोन नावे सध्या चर्चेत आहेत. प्रमोद सावंत विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यासमोर काही कायदेशीर अडचणी आहेत. देशात निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना असा प्रसंग पहिल्यांदाच उद्भवला आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते राज्यपालांना अशा प्रकरणात निर्णय घेताना आचार संहिता लागू होत नाही.

राज्यपाल सत्ताधारी पक्षाने सुचवलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला सत्ता स्थापनेसाठी बोलवू शकतात. परंतु र्पीकरांच्या नेतृत्वाखालील सरकार पक्ष सध्या अल्पमतात असून भाजपची सदस्यसंख्या १३ तर विरोधी काँग्रेस पक्षाची सदस्य संख्या १४ आहे. सरकार पक्षात सहभागी मगो पक्ष सरकारला बिनशर्त पाठिंबा असल्याचे सांगत नसल्याने पेचप्रसंग वाढला आहे तर सरकार पक्षातील दुसरा गट गोवा फॉरवर्ड आणि इतर तीन अपक्ष यांनीही अद्याप आपला पवित्रा स्पष्ट केलेला नाही.