आम्हालाच पर्रीकरांची प्रकृती पाहावत नाही त्यांनी सन्मानाने खुर्ची सोडावी

पणजी : गोवा वृत्तसंस्था – मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दोन माणसांना धरून चालावे लागते आहे. त्यांची परिस्थिती आम्हाला पाहवत नाही. त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री पद सन्मान पूर्वक रिक्त करावे अशी मागणी गोवा काँग्रेसने आज शनिवारी केली आहे.

पणजीच्या काँग्रेस हाऊसमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी मंत्री रमाकांत खलप यांच्या सह काँग्रेसचे प्रवक्ते आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आदी काँग्रेस नेते उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी हि मागणी केली आहे. मनोहर पर्रीकर यांनी राजीनामा द्यावा असे आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांना स्वतःलाच त्यांची स्थिती समजायला हवी. त्यांची सध्याची परिस्थिती पहिली तर त्यांनी स्वतः त्यांची परिस्थिती ओळखून घ्यायला हवी. पर्रीकरांची प्रकृती पाहता त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी करण्याची आवश्यकता आहे. त्याच प्रमाणे पर्रीकरांच्या अशा आरोग्यामुळे गोव्याची योग्य प्रतिमा जगात जात नाही असे काँग्रेसचे प्रवक्ते आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले आहेत.

फ्रान्सिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर हे भाजपाचे दोन आमदार ज्या प्रमाणे पर्रीकरांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत त्याच प्रमाणे पर्रीकरांनी स्वतः आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.पर्रीकरांनी आरोग्यासाठी सन्मानाने खुर्ची सोडावी असे काँग्रेसचे प्रवक्ते लॉरेन्स म्हणाले आहेत.

पर्रीकरांच्या विधानसभेच्या कामगिरीवर आपणास काय वाटते असे काँग्रेस नेत्यांना पत्रकारांनी विचारले असता लोकांनी मुख्यमंत्र्यांची प्रकृती टीव्हीवर लाईव्ह बघितली आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री पर्रीकर आणि त्यांच्या सहकार्यावर कसली हि व्यक्तिगत टीका करणार नाही असे लॉरेन्स म्हणाले आहेत.