भाजपचा पाठिंबा काढून घेणार्‍या अपक्ष आमदाराच्या घरावर आयकर विभागाची धाड

चंदीगड : पोलीसनामा ऑनलाईन –   हरियाणातील भाजपच्या खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेणा-या आणि केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करणा-या अपक्ष आमदार बलराज कुंडू यांच्या घरासह 30 पेक्षा जास्त ठिकाणी आयकर विभागाने गुरुवारी (दि. 25) छापे टाकले. आयकर विभागाच्या पथकाने सकाळी रोहतकच्या सेक्टरमध्ये असलेल्या त्यांच्या घरावर आणि गुरुग्राममधील घरावर छापा टाकला आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीच्या माहेरी हिसारच्या हांसीमध्ये आणि त्यांच्या दोन भावांच्या घरावर छापा टाकला आहे. तसेच त्यांचे व्यवसाय आणि कुटुंबातील सदस्यांच्या घरी छापेमारी झाली.

बलराज कुंडु हे महममधील अपक्ष आमदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये हरियाणा विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यावेळी भाजपने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला होता. कुंडू यांनी भाजप उमेदवार समशेर सिंह यांना हरवल होते. त्यानंतर त्यांनी मनोहरलाल खट्टर सरकारला समर्थन दिले होते. आमदार कुंडू यांनी उघडपणे तिन्ही कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकऱ्यांचे समर्थन केले होते. तसेच ते माजी सहकार मंत्री मनीष ग्रोवर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. पण, खट्टर सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी सरकारचे समर्थन वापस घेतले होते. कुंडू यांनी आरोप केला होता की मुख्यमंत्री खट्टर भ्रष्ट लोकांचे समर्थन करत असल्याचा आरोप करत त्यांनी पाठिंबा काढून घेतला होता. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.