मनोज सिन्हा होतील जम्मू-काश्मीरचे नवीन उपराज्यपाल, जीसी मुर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मनोज सिन्हा आता जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल असतील. गिरीशचंद्र मुर्मू यांनी बुधवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता गुरुवारी सकाळी मनोज सिन्हा यांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपती भवनातर्फे करण्यात आली आहे. 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे, दरम्यान बुधवारी संध्याकाळी जीसी मुर्मू यांच्या राजीनाम्याची अचानक बातमी आली. मुर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.

आता जेव्हा नव्या एलजीची जबाबदारी मनोज सिन्हा यांच्यावर सोपविण्यात आली आहे, तेव्हा पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या उच्च पदासाठी राजकीय प्रवेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीर संपूर्ण राज्य असताना सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते, परंतु केंद्रशासित प्रदेश झाल्यावर अधिकारी जीसी मुर्मू यांना पाठविण्यात आले. जीसी मुर्मू यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये गणना केली जाते.

मनोज सिन्हा कोण आहेत?

मनोज सिन्हा पूर्वी गाझीपूरचे खासदार राहिले आहेत आणि ते पूर्व उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचा एक मोठा चेहरा आहेत. तथापि 2019 सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती, ज्यास एक मोठा धक्का मानण्यात आले. मनोज सिन्हा मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री राहिले आहेत आणि त्यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री आणि संप्रेषण राज्यमंत्रीपद होते.

उत्तर प्रदेशच्या 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळविला, तेव्हा मनोज सिन्हा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. ते दिल्लीहून वाराणसीला पूजेसाठी देखील पोहोचले होते आणि त्यांना आशा होती की ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पण योगी आदित्यनाथ यांना पक्षाने पुढे केले. मनोज सिन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू नेत्यांमध्ये गणले जातात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून मनोज सिन्हा यांना जबाबदारी देण्यात आली आहे.