जनतेने मोदींना स्वीकारलं तर विवेकला नाकारलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –लोकसभा निवडणुकी दरम्यान वादात सापडलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रदर्शित झाला. एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मिळवलेला प्रचंड विजय तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट प्रदर्शित झाला. असा योगायोग जुळून आल्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाला मोठा प्रतिसाद देतील असे वाटले होते. पण हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ २.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं आहे.

‘boxofficeindia.com’ या वेबसाईट नुसार, या चित्रपटाने देशात २.२५ ते २.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील असे वाटले होते पण या चित्रपटाच्या सुमार दर्जामुळे म्हणावा तसा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला नाही. या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉयचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे लोकसभा निकालानंतर जनतेने मोदींना स्वीकारला तर विवेकला नाकारलं असच म्हणाव लागेल.

दरम्यान, या चित्रपटासोबतच अर्जुन कपूरचा ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ आणि हॉलिवूड चित्रपट ‘अलादीन’ प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटांपैकी ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटानेदेखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसून ‘अलादीन’ या चित्रपटाने मात्र ४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.