चिंताजनक ! पुढील 3 महिन्यांत नवीन नोकऱ्या मिळणं कठीण, केवळ 19 % कंपन्याच करणार फ्रेशर्सची भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक आर्थिक मंदीचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसत आहे. पुढील 3 महिन्यांत फक्त 19 टक्के कंपन्याच फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याचा विचार करत आहेत. तर 52 टक्के कंपन्या मनुष्यबळ वाढवू शकत नाही. एका वैश्विक संस्थेच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. वैश्विक संस्था ‘मॅनपावर ग्रुप एम्पलॉयमेंट आउटलुक’ या जागतिक संस्थेचे हे सर्वेक्षण जाहीर केले. या सर्वेक्षणात जवळपास 5131 कंपन्यांशी संपर्क करण्यात आला होता.

केवळ 19% कंपन्याच वाढवणार मनुष्यबळ
देशभरातील 5131 कंपन्यांशी ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत आर्थिक स्थिती आणि नव्या नोकऱ्यांच्या शक्यतांबाबत चर्चा केली. त्यात अवघ्या 19 टक्के कंपन्यांनी मनुष्यबळ वाढवली जाऊ शकते असं सांगितलं. तर कर्मचारी संख्येत बदल होईल अशी अपेक्षा नाही, असं 52 टक्के कंपन्यांनी स्पष्ट केलं. तर कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत काही सांगू शकत नाही, असं 28 टक्के कंपन्यांनी सांगितलं.

नवीन रोजगारांच्या बाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर
नव्या नोकऱ्या निर्माण होण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर राहील असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तिमाहीत नव्या नोकऱ्या निर्माण करण्यात जपान पहिल्या, तैवान दुसऱ्या आणि अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असेल असा अंदाज आहे.

 

You might also like